
कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे क्रिकेट या खेळातही बदल करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी गोलंदाजांना चेंडूला लाळ लावण्यापासून रोखण्यात आले. यावर बंदी लावण्यात आली. मात्र मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने या नियमाला विरोध करताना म्हटले की, सध्या गोलंदाजांना चेंडूला लाळ लावायला देण्यात येत नाहीए. यामुळे जगभरातील गोलंदाज अपंगच ठरत आहेत. लाळ लावल्याशिवाय चेंडूला नाचवता येत नाही. गोलंदाजांवर बंधने आणली तर हा फक्त फलंदाजांचाच खेळ राहील. अशा परिस्थितीत फलंदाजांना रोखणे मुश्किल होईल, असेही सचिन तेंडुलकरला वाटते. क्रिकेटमध्ये गोलंदाजांसाठी घाम आणि लाळ हे दोन महत्त्वाचे पर्याय असतात. फलंदाजांना रोखून ठेवण्यासाठी किंवा त्यांना बाद करण्यासाठी गोलंदाज याच दोन गोष्टींचा उपयोग करतो. यामध्ये गोलंदाजांकडून 60 टक्के लाळेचा आणि 40 टक्के घामाचा वापर केला जातो. या दोघांशिवाय गोलंदाज अपंगच आहेत. सध्या या दोन्ही गोष्टींना अन्य पर्यायही नाहीत. फलंदाजांना ऑफ साईडवरील फटक्यांवर बंदी लावत त्यांना फक्त लेग साईडला फटके मारण्यास सांगितल्यानंतर काय होईल, अशीच अवस्था गोलंदाजांची यावेळी झाली आहे, असे सचिन तेंडुलकर यावेळी म्हणाला.





























































