
पाहुण्या वेस्ट इंडीजने चेन्नईमध्ये विजयी सलामी देत एकदिवसीय क्रिकेट मालिकेची झकास सुरुवात केली होती. मात्र, विशाखापट्टणममध्ये विंडीजचा धुव्वा उडवून ‘टीम इंडिया’ने मालिकेत पुनरागमन केले. आता रविवारी कटकमध्ये अखेरचा आणि निर्णायक सामना रंगणार असून कोण कोणाचा काटा काढून मालिका जिंकणार यासाठी तमाम क्रिकेटशौकिनांची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. विराट कोहलीची सेना विंडीजविरुद्ध सलग दहावी द्विपक्षीय मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल, तर पाहुणा संघ पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.
- ‘टीम इंडिया’ला वेस्ट इंडीजविरुद्ध सलग दहावी द्विपक्षीय मालिका जिंकण्याची संधी.
- 13 वर्षांत विंडीजला अद्यापि एकदाही हिंदुस्थान दौऱयावर द्विपक्षीय मालिका जिंकता आलेली नाही.
- मागील 15 वर्षांत हिंदुस्थानने सलग दोन द्विपक्षीय मालिका गमावलेल्या नाहीत.
क्षेत्ररक्षणातील चुकांची पुनरावृत्ती नको
विराट कोहलीच्या सेनेने विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत आपल्या लौकिकास साजेसे क्षेत्ररक्षण केलेले नाही. श्रेयस अय्यरने शिमरॉन हेटमायरला सुरेख धावचीत केले, पण दीपक चहरने निकोलस पूरन आणि शाई होप यांचे झेल सोडले. क्षेत्ररक्षणात ढिसाळपणा होतोय हे स्वतः कर्णधार कोहलीनेही मान्य केले आहे. त्यामुळे आता निर्णायक लढतीत क्षेत्ररक्षणातील चुकांची पुनरावृत्ती व्हायला नकोय. कटकमधील खेळपट्टीही फलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे हेटमायर आणि होप यांना रोखण्यासाठी हिंदुस्थानी गोलंदाजांचा कस लागणार आहे.
विंडीजचे फलंदाज फॉर्मात
हिंदुस्थान दौऱयावर चमकदार कामगिरी करणारे शिमरॉन हेटमायर व शेल्डन कॉटरेल यांना ‘आयपीएल’च्या लिलावात मोठी किंमत मिळाली. हेटमायरसाठी दिल्ली कॅपिटलने 7 कोटी 75 लाख रुपये मोजले, तर कॉटरेलसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने 8 कोटी 50 लाख रुपये मोजले. शिवाय मालिकेत रोहित शर्मानंतर सर्वाधिक धावा करणारा शाई होप निर्णायक लढतीत ‘टीम इंडिया’च्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरू शकतो. कर्णधार कॉयरॉन पोलार्डला अद्याप आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आला नसला तरी या अनुभवी खेळाडूमध्ये एकहाती सामना फिरविण्याची क्षमता आहे. त्यामुळे मोहम्मद शमी ऍण्ड कंपनीवर विंडीजच्या फलंदाजांना रोखण्यासाठी अचूक टप्प्यावर मारा करावा लागणार आहे.
उभय संघ
हिंदुस्थान – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयर अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जाडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर.
वेस्ट इंडीज – कायरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील अंबरीश, शाई होप, खॅरी पियरे, रोस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्टरेल, ब्रॅण्डन किंग, निकोलस पूरन, शिमरान हेटमायर, एविन लुईस, रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वाल्श ज्युनियर.























































