धवनच्या साथीत दुसरा सलामीवीर कोण? मयांक, शुभमन यांच्यासह राहुलही चर्चेत

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया बहुचर्चित एकदिवसीय क्रिकेट मालिकेला 27 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. ‘आयपीएल’मधील जबरदस्त फॉर्ममुळे अनुभवी शिखर धवनला सलामीसाठी संघ व्यवस्थापनाची पहिली पसंती आहे. मात्र, त्याच्या साथीला दुसरा सलामीवीर म्हणून कोणाला खेळवायचे, याबाबतचा प्रश्न अद्यापि सुटलेला नाही. मयांक अग्रवाल व शुभमन गिल ही दोन नावे यासाठी सध्या आघाडीवर असून, लोकेश राहुलचेही नाव चर्चेत आहे.

रोहित, इशांत यांना लवकर रवाना व्हावे लागेल

ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि इशांत शर्मा यांच्या सहभागाबद्दल ‘टीम इंडिया’चे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr यांनी अद्याप संभ्रम असल्याचे सांगितले आहे. कारण हे दोघेही सध्या बंगळुरूमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहेत; परंतु ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी कोरोनाचे नियम लक्षात घेता 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी रोहित आणि इशांत शर्मा यांना येत्या 3-4 दिवसांत ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावेच लागेल. रोहितला आणखी काही काळ विश्रांतीचा सल्ला देण्यात आला तर मग खरंच अडचणी वाढू शकतात. ऑस्ट्रेलियात आल्यानंतर 14 दिवस क्वारंटाइन आणि त्यानंतर कसोटी मालिकेत खेळणे हे समीकरण जुळणे वाटते तितके सोपे नाही.

राहुल यष्टिरक्षक फलंदाज

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने तर यंदाच्या आयपीएलमध्ये 670 धावा चोपल्या. शिवाय गतवर्षीच्या वर्ल्डकपमध्ये शिखर धवन जायबंदी झाल्यानंतर राहुलने सलामीवीराची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याच्याही नावाचा आघाडीच्या फलंदाजीसाठी विचार होऊ शकतो. राहुल हा सलामीवीर म्हणून तगडा पर्याय असला, तरी तो यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्यावरील लोड कमी करण्यासाठी त्याला मधल्या फळीतही खेळविण्याचा विचार होऊ शकतो.

मयांक, शुभमनकडून धावांची लयलूट

यंदाच्या आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा मयांक अग्रवाल व कोलकाता नाइट रायडर्सचा शुभमन गिल यांनी 400हून अधिक धावांची लयलूट केलेली आहे. मयांकने तर एक शतकी खेळीही केली होती. त्याने यूएईमध्ये 418 धावा, तर शुभमनने 440 धावा फटकावल्या. त्यामुळे या दोघांपैकी एकाला सलामीवीर म्हणून खेळविण्याची शक्यता आहे.

नऊ खेळाडूंचे खेळणे निश्चित

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ‘टीम इंडिया’तील 9 खेळाडूंचे खेळणे जवळपास निश्चित आहे. यात शिखर धवन, कर्णधार विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल व जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. याचबरोबर मोहम्मद शमी नवदीप सैनीच्या साथीने वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतो. शमी व बुमराह यांना कसोटीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी संघ व्यवस्थापनाकडे शार्दुल ठाकूर हाही एक चांगला पर्याय आहे.

आपली प्रतिक्रिया द्या