
पहिल्यावहिल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणारा… पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत दमदार हॅटट्रिक संपादन करणारा… अन् तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अष्टपैलू म्हणून चमकदार कामगिरी करणारा… ही स्तुती इरफान पठाणसाठीच. बडोद्यात जन्म झालेल्या या पठ्ठय़ाने शनिवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
इरफान पठाणने वयाच्या 35 व्या वर्षी क्रिकेटला अलविदा केले. त्याने हिंदुस्थानसाठी 29 कसोटी सामने, 120 वन डे सामने आणि 24 टी-20 सामन्यांत सर्वस्व पणाला लावले. इरफानने कसोटीत 100 तर वन डेत 173 फलंदाज बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 301 बळी घेण्याचा पराक्रम त्याने केला. शिवाय कसोटीत त्याने एक शतक व सात अर्धशतकांसह 1105 धावा फटकावल्या असून वन डे क्रिकेटमध्ये पाच अर्धशतकांसह 1544 धावा करण्यात त्याला यश लाभले.


























































