मुंबईचा पाय खोलात, रणजी क्रिकेट स्पर्धा, एलिट ‘ब’ गट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वाधिक 41 वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबईला येथे सुरू असलेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘ब’ गटातील लढतीत दुसऱया दिवशीही अपयशाचा सामना करावा लागला आहे. मुंबईला पहिल्या डावात 114 धावांमध्ये गुंडाळल्यानंतर रेल्वेने पहिल्या डावात 266 धावा फटकावत पहिल्या डावात 152 धावांची आघाडी घेतली. मुंबईने दुसऱया दिवसअखेरीस 3 बाद 64 धावा केल्या असून अजूनही त्यांचा संघ 88 धावांनी पिछाडीवर आहे.

रेल्वेने 5 बाद 116 या धावसंख्येवरून गुरुवारी पुढे खेळायला सुरुवात केली. अरिंदम घोषने 72 धावांची आणि कर्णधार कर्ण शर्माने नाबाद 112 धावांची खेळी साकारून रेल्वेसाठी मोलाची कामगिरी बजावली. या खेळीत त्याने चार षटकार व 15 चौकार चोपून काढले. अविनाश यादवने 34 धावा केल्या. मुंबईकडून तुषार देशपांडेने 44 धावा देऊन चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दीपक शेट्टीने तीन, आकाश पारकरने दोन व सिद्धेश लाडने एक फलंदाज बाद केला.

रहाणे, सूर्यकुमारवर मदार

मुंबईच्या दुसऱया डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ (23 धावा), जय बिस्ता (13 धावा), सिद्धेश लाड (8 धावा) यांना निराशेला सामोरे जावे लागले. त्यामुळे मुंबईची अवस्था 3 बाद 45 धावा अशी झाली. हिमांशू सांगवानने दोन व टी. प्रदीपने एक फलंदाज बाद केला. अजिंक्य रहाणे तीन धावांवर तर सूर्यकुमार यादव 15 धावांवर खेळत असून उद्या या दोघांवरच मुंबईची मदार असणार आहे.