शॉर्ट रनचा फटका पंजाबला बसला, पंच नितीन मेनन यांच्या निर्णयावर टीका

वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा याने सुपर ओव्हरमध्ये केलेल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने रविवारी मध्यरात्री झालेल्या आयपीएलमधील लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला आणि महत्त्वाचे दोन गुण कमवले. या लढतीत अष्टपैलू कामगिरी करणाऱया मार्कस स्टोयनिसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. यावेळी या लढतीचे सामनावीर पंच नितीन मेनन यांची निवड करायला हवी होती असा सूर वीरेंद्र सेहवागसह इतर क्रिकेटप्रेमींमधून निघू लागला. 19व्या षटकात मयांक अग्रवाल व ख्रिस जॉर्डन यांनी घेतलेल्या दोन धावांपैकी एक धाव शॉर्ट घेतल्याचा निर्णय पंच नितीन मेनन यांनी घेतला. याचा फटका किंग्स इलेव्हन पंजाबला बसला. एक धाव दिली गेली असती तर ही लढत निर्धारित वेळेतच संपली असती. सुपर ओव्हरची गरज भासली नसती. किंग्स इलेव्हन पंजाब संघ विजयी झाला असता अशी टीका यावेळी होऊ लागली आहे.

मार्कस स्टोयनिस, कॅगिसो रबाडा, मयांक अग्रवाल चमकले

दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करीत 8 बाद 157 धावा तडकावल्या. मार्कस स्टोयनिस याने 21 चेंडूंत 53 धावा फटकावल्या. धावांचा पाठलाग करताना किंग्स इलेव्हन पंजाबकडून मयांक अग्रवालने 60 चेंडूंत 89 धावा फटकावत संघाला विजयासमीप नेले, पण विजयासाठी एक धाव बाकी असताना तो बाद झाला आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनही बाद झाला आणि लढत टाय झाली. सुपर ओव्हरमध्ये कॅगिसो रबाडा याने अवघ्या दोन धावांच्या मोबदल्यात किंग्स इलेव्हन पंजाबच्या लोकेश राहुल व निकोलन पूरण यांना बाद केले. अखेर रिषभ पंतने काढलेल्या दोन धावांनंतर दिल्ली कॅपिटल्सने ही लढत सुपर ओव्हरमध्ये जिंकली.

प्रत्यक्षात झाले काय

दिल्ली कॅपिटल्ससाठी 19वे षटक कॅगिसो रबाडा टाकत होता. या षटकातील तिसऱया चेंडूवर मयांक अग्रवाल याने लाँग ऑनच्या दिशेने फटका मारला. यावेळी मयांक अग्रवाल व ख्रिस जॉर्डन यांनी दोन धावा घेतल्या, पण आयसीसीच्या एलिट पॅनेलमध्ये नुकतेच नियुक्त करण्यात आलेले पंच नितीन मेनन यांनी ख्रिस जॉर्डनकडून एक धाव शॉर्ट घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोनऐवजी एकच धाव किंग्स इलेव्हन पंजाबला मिळाली, पण रिप्लेमध्ये बघितले असता ख्रिस जॉर्डनच्या बॅटने व्यवस्थित रेषा ओलांडली होती हे दिसून आले. अखेर ही एक धावच किंग्स इलेव्हन पंजाबसाठी घातक ठरली.

पंजाब संघाने केले अपील

ख्रिस जॉर्डनने व्यवस्थित धाव पूर्ण केल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. तरीही पंच नितीन मेनन यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने शॉर्ट रनचा निर्णय घेण्यात आला. अखेर लढत टाय झाली आणि सुपर ओव्हरमध्ये हा सामना आम्ही गमावला. ती एक धाव आम्हाला मिळाली असती तर तो सामना आम्ही निर्धारीत केळेतच जिंकू शकलो असतो. असे किंग्स इलेव्हन पंजाब संघ व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले असून पंचांविरोधात त्यांनी अपीलही केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या