
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
चीनमध्ये होणाऱ्या 2022च्या आशियाई कीडा स्पर्धेत पुरुष व महिला संघांतील टी-20 क्रिकेटचा थरार बघायला मिळणार आहे. झीजियांग प्रांताची राजधानी हांगझाऊ येथे 10 ते 25 सप्टेंबरदरम्यान 19वी आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. याआधी, आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत दोन वेळा क्रिकेट स्पर्धा झालेली आहे, मात्र दोन्ही वेळा हिंदुस्थानचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले नव्हते.
हिंदुस्थान ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) महासचिव राजीव मेहता यांनी ही माहिती दिली. आशियाई स्पर्धा होणारे हांगझाऊ हे चीनमधील तिसरे शहर ठरणार आहे. याआधी 1990मध्ये बीजिंगमध्ये, तर 2010साली ग्वांगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्या होत्या. आता 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष आणि महिला संघांमध्ये टी-20 क्रिकेट स्पर्धा होणार आहे.
2010 मधील ग्वांगझू आणि 2014मधील इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला होता. 2010मध्ये 11 क्रिकेट संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यावेळी पुरुष गटात बांगलादेशने, तर महिला गटात पाकिस्तानने सुवर्णपदक जिंकले होते. 2014 मध्ये 13 देशांतील संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यावेळी पुरुष गटात श्रीलंकेने, तर महिला गटात पाकिस्तानचे विजेतेपद पटकावले होते. आता तिसऱयांदा आशियाई स्पर्धेत क्रिकेट खेळाचा समावेश करण्यात आला आहे.




























































