
‘टीम इंडिया’चा उपकर्णधार रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱयातून वगळल्याने संघनिवड समितीवर सध्या टीकेची झोड उडाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही बचावात्मक पवित्रा घेतला आहे. निवड प्रक्रियेत आपला सहभाग नव्हता, असे सांगून ते मोकळे झाले. मात्र प्रशिक्षक या नात्याने रवी शास्त्री यांचे बोलणे न पटणारे आहे, असा स्ट्रेट ड्राइव्ह हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने लगावलाय.
सेहवाग म्हणाला, रोहित शर्माला संघातून का वगळले याबद्दल रवी शास्त्री यांना काहीच माहिती नसणे ही मनाला न पटणारी गोष्ट आहे. शास्त्रीचा निवड प्रक्रियेत सहभाग नसला तरी प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी चर्चा न करता संघ निवडला जात नाही. रोहितसारख्या महत्त्वाच्या खेळाडूला संघातून वगळायचे असल्यास निवड समिती प्रशिक्षक व कर्णधार यांच्या परस्पर असा निर्णय कसा घेऊ शकेल. त्यामुळे ‘टीम इंडिया’च्या निवडीवरून सध्या संभ्रमाचे वातावरण आहे, असे मत सेहवागने व्यक्त केले.
…मग ‘टीम इंडिया’साठी निवड का नाही?
रोहित शर्माला दुखापत झाल्याने तो आयपीएलमध्ये चार लढतीला मुकला, मात्र हैदराबादविरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्यात तो खेळला. रोहित आयपीएलमध्ये खेळू शकतो, मग ‘टीम इंडिया’साठी का नाही? असा सवाल वीरेंद्र सेहवागने केला आहे. स्वतः रोहितने आपण शंभर टक्के फिट असल्याचे हैदराबादविरुद्धच्या लढतीपूर्वी सांगितले आहे. खेळाडू स्वतः सांगतोय मी फिट आहे. मग अनफिटचे कारण सांगून एका महत्त्वाच्या खेळाडूला संघाबाहेर करणे चुकीचे आहे, असेही वीरू म्हणाला.


























































