दोन वर्ल्ड कपसह तीन स्पर्धांसाठी ‘बीसीसीआय’ची फिल्डिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2024पासून सुरू होणाऱया आठ वर्षांच्या कार्यक्रमपत्रिकेत हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोन वर्ल्ड कपसह तीन जागतिक स्पर्धांच्या यजमान पदासाठी बोली लावण्याचा निर्णय घेतला आहे. दर दोन वर्षांनी ‘आयसीसी’च्या एका स्पर्धेचे आपण आयोजन करायचे, असेही या महत्त्वपूर्ण बैठकीत ठरले आहे.

‘बीसीसीआय’च्या ऑनलाईन कार्यकारी परिषदेच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. ‘बीसीसीआय’ने 2025ची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा, 2028चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2031मध्ये होणाऱया वन डे वर्ल्ड कपसाठी बोली लावण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ पदाधिकाऱयाने दिली.

2-3 वर्षांनी एक स्पर्धा घेण्यास सक्षम

चॅम्पियन्स ट्रॉफी एक छोटी पण प्रसिद्ध स्पर्धा आहे. त्यामुळेच आम्ही 2023च्या वन डे वर्ल्ड कपनंतर 2025मध्ये होणाऱया चॅम्पियन्स स्पर्धेचे यजमान पद घेण्याचे ठरवले आहे. दर 2-3 वर्षांनी आयसीसीच्या एका स्पर्धेचे यजमान पद स्वीकारण्यास आम्ही सक्षम असल्याचे ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱयाने ठासून सांगितले. 2017नंतर न झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे, असे नुकतेच ‘आयसीसी’ने स्पष्ट केले होते. त्यानुसार आगामी कार्यक्रमपत्रिकेत त्याचा समावेश करण्यात येणार आहे. 2023च्या वन डे वर्ल्ड कपनंतर ‘बीसीसीआय’ने आगामी योजना या वेळी स्पष्ट केल्या.

ऑलिम्पियनच्या तयारीसाठी 10 कोटींची मदत

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या हिंदुस्थानी खेळाडूंच्या तयारीसाठी बीसीसीआयने 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणाऱया टोकियो ऑलिम्पिकमध्ये शंभरहून अधिक हिंदुस्थानी खेळाडू सहभागी होणार आहेत. या आर्थिक मदतीचा उपयोग खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि सुविधा पुरवण्यासाठी केला जाणार आहे.

रणजी नुकसानभरपाईसाठी समिती

कोरोनाच्या संकटामुळे 2020च्या हंगामात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे खेळाडूंना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय ‘बीसीसीआय’ने घेतला होता. मात्र या नुकसानभरपाईचे स्वरूप निश्चित करण्यासाठी ‘बीसीसीआय’ने 10 सदस्यीय समिती नियुक्ती केली आहे. या समितीत चारही विभागांचे एकेक प्रतिनिधी, चार कार्यकारिणी सदस्य, अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांचा समावेश करण्यात आला आहे. रणजीपटूंना एका सामन्यासाठी 1.40 लाख रुपये दिले जातात. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून खेळाडूंना किती पैसे दिले जातात, हे बघावे लागेल.