आता वर्ल्ड कपमधील देशांची संख्या वाढणार, आयसीसीचा नवा गेम प्लान

आयसीसी टी-20 व वन डे वर्ल्ड कपमधील देशांची संख्या वाढवण्याचा विचार करीत आहे. या नव्या प्लाननुसार आयसीसीकडून टी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 ऐवजी 20 देशांचा सहभाग निश्चित करण्यात येणार आहे.

वन डे वर्ल्ड कपमध्येही जास्त देशांचा सहभाग असावा यासाठी आयसीसीकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. मीडियामधून हे वृत्त समोर आले असले तरी आयसीसीकडून या नव्या गेम प्लानवर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही.

वन डे वर्ल्ड कपमध्येही 14 देशांचा प्रवेश

वन डे वर्ल्ड कपमध्ये जास्तीत जास्त देशांचा सहभाग असल्यास दुबळय़ा संघांच्या सहभागामुळे रोमहर्षक लढती कमी प्रमाणात पाहायला मिळतात. याचा फटका ब्रॉडकास्टर्सपासून सर्वांनाच बसतो. यामुळे 2019 सालामध्ये इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये फक्त 10 देशांचाच सहभाग होता. पण आता वन डे वर्ल्ड कपमधील देशांचा सहभागही वाढवण्याचा विचार आयसीसी करीत आहे.

ही संख्या 10 वरून 14 वर नेण्यात येणार आहे. 2023 सालामध्ये हिंदुस्थानात वन डे वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमध्ये 10 देशांचाच सहभाग असणार आहे. त्यानंतरच्या वन डे वर्ल्ड कपमध्ये देशांचा सहभाग वाढवण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

आतापर्यंत झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमधील देशांचा सहभाग

2007  – 12
2009  – 12
2010  – 12
2012  – 12
2014 – 16
2016  – 16

आतापर्यंत झालेल्या वन डे वर्ल्ड कपमधील देशांचा सहभाग

1975  – 8
1979  – 8
1983  – 8
1987  – 8
1992 – 9
1996  – 12
1999  – 12
2003  – 14
2007  – 16
2011  – 14
2015 – 14
2019  – 10

2021 अर्थातच या वर्षी हिंदुस्थानात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर 2022 सालामध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये बदलही होऊ शकतात, पण सध्या तरी हीच परिस्थिती आहे.

मात्र या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये 16 देशांचाच सहभाग असणार आहे. 2024 सालानंतर होणाऱया टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 देशांना एण्ट्री देण्यात येण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या