
वाळू, माती, मुरूम वाहतुकीचा व्यवसाय तहसीलदारांना सांगून सुरू करून देण्यासाठी 20 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी माण तालुक्यातील दहिवडी तहसीलदारांच्या गाडीवरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सांगली टीमने ही कारवाई केली आहे. कृष्णदेव उर्फ किसन दत्तात्रय गुजर (वय 34, रा. राणंद, ता. माण) असे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकलेल्याचे नाव आहे.
कृष्णदेव उर्फ किसन गुजर हा कोतवाल असून, तो दहिवडीच्या तहसीलदारांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत आहे. संबंधित तक्रारदाराचा वाळू, माती, मुरूम वाहतुकीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय तहसीलदारांना सांगून सुरू करून देतो, पण या बदल्यात दर महिन्याला 25 हजार रुपये द्यावेत, अशी त्याने मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने सांगली येथील लाचलुचपत कार्यालयात लेखी तक्रार केली. या पार्श्वभूमीवर सांगलीच्या लाचलुचपत विभागाने खात्री केली असता, किसन गुजर याने चर्चेअंती 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. एवढेच नव्हे तर वाळू, माती, मुरूम वाहतुकीचा व्यवसाय सुरू करण्यास त्याने सांगितल्याचेही निष्पन्न झाले.
मात्र, किसन गुजर याला तक्रारदाराची शंका आल्याने त्याने लाच रक्कम स्वीकारली नाही; परंतु लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चालक किसन गुजर याच्यावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




























































