
अवैधरित्या जवळ पिस्तूल बाळगणार्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा यूनिट दोनच्या पथकाने रंगेहात अटक केली. त्याच्याकडून 40 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. अजय विष्णू थोपटे (19, रा. जनता वसाहत, पर्वती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
शहरात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारांनी दहशत माजविली आहे. कोयता तसेच काही ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून शहरात गस्त वाढविण्यात आली असून सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात येत आहे. यानूसार गुन्हे शाखा यूनिट दोनचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान सिंहगड रस्ता परिसरात एकजण पिस्तूलासह थांबल्याची माहिती यूनिट दोनचे अंमलदार नामदेव रेणूसे, उत्तम तारू यांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून थोपटे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी पिस्तूल आढळून आले. यानूसार त्याच्यावर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल पवार, यूनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वैशाली भोसले, अंमलदार उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय जाधव, नागनाथ राख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.