
देशात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे बीसीसीआयला धर्मशाळेत सुरु असलेला सामना अर्धवट अवस्थेतच रद्द करावा लागला. तसेच आयपीएलच्या आयोजनावरही अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. देशभरातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच उद्या शुक्रवारी आयपीएलबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.
धर्मशाळेतील सामना रद्द करताच सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवणे हीच आमची प्राथमिकता असल्याचे सांगत सर्वांना उना रेल्वे स्थानकाहून विशेष ट्रेनने दिल्ली येथे पोहचविले जाणार आहे. उना हे ठिकाण धर्मशाळाहून 110 किमी दूर असून 2-3 तासांच्या कारप्रवासानंतर सर्व खेळाडू आणि कर्मचारी रेल्वे स्थानकावर पोहोचतील. या ट्रेनने सर्वांना तत्काळ आणि सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठीच या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
रद्द की स्थलांतरीत ?
आगामी 24 तासांतील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर पूर्ण स्पर्धा रद्द करायची की अन्य ठिकाणी स्थलांतरित करायची याबाबत बीसीसीआयची तत्काळ बैठक शुक्रवारी होणार आहे. हे सारे देशात निर्माण झालेल्या परिस्थितीच्या गांभीर्यावर अवलंबून असल्याचे कळले आहे.