शेतकऱ्यांकडून कमी दराने भाजीपाल्याची खरेदी, शेतमजुरांच्या उत्पन्नावर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरिपाचे नुकसान झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. भाजीपाला काढणीला आलेला असताना दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून भाजीपाला मातीमोल दराने घेतला जात आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या आणि भाजीपाला क्षेत्रात काम करणाऱ्या शेतमजुरांच्या उत्पन्नावर झाला आहे. भाजीपाल्याला पुरेसा दर मिळत नसल्याने काढणी करणाऱ्या मजुरांना केवळ शंभर ते एकशे पंचवीस रुपये मजुरी मिळत आहे. याबाबत शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात यंदा पाऊस लांबला. तसेच सरासरीपेक्षा पन्नास टक्के जास्त पाऊस झाला. अतिरिक्त आणि लांबलेल्या पावसाने खरिप हंगामातील ज्वारी, बाजरी, मका या पिकांचे नुकसान केले. कालांतराने विहीर असलेल्या शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. अनेक शेतकऱ्यांनी पालक, मुळा, मेथी, कोथिंबीर असा भाजीपाला घेतला. गेल्या आठ दिवसांपासून या भाजीपाल्याची काढणी सुरू झाली आहे. पण, दर मात्र घसरले आहेत. शेतकऱ्यांकडून घाऊक व्यापारी पाच रुपयात जुडी या दराने मेथी, पालक आणि मुळा खरेदी करीत आहेत. शेतकऱ्यांना किमान सहा ते सात रुपये दर अपेक्षित आहे. परंतु बाजारात मागणी नाही असे म्हणत घाऊक आणि किरकोळ व्यापारी मातीमोल दराने शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करीत आहेत. खरिपाचे नुकसान झाल्यानंतर चरितार्थासाठी आम्ही भाजीपाल्याचे उत्पन्न घेतले. उत्पादनावरील खर्च आणि मेहनत पाहिली तर अपेक्षित दर नाही. अनेकदा तर काढणी करण्यासाठी पैसे नाहीत असे म्हणत शेतकऱ्यांनी हतबलता व्यक्त केली.

तालुक्यातील कापडणे, सोनगीर, देवभाने या भागात सध्या मुळ्याची काढणी सुरू आहे. मुळ्याची काढणी करणाऱ्या शेतमजुरांपैकी अनिता माळी यांनी सांगितले की, मुळ्याची काढणी करण्यासाठी दिवसभर मेहनत लागते. पण, शेतकऱ्यांकडून जास्तीत जास्त 125 रुपये मजुरी दिली जात आहे.

इतक्या कमी दरात दिवसभर राबणे अशक्य आहे. पण, शेतकऱ्यालाच अपेक्षित पैसा मिळत नसल्याने तो आमच्याकडून कमी मजुरीत काम करवून घेतो. गावात उत्पन्नाचे दुसरे साधन नाही. त्यामुळे मिळेल त्या दरात राबण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. सरकारने शेतकरी आणि त्यापाठोपाठ मजुरांची वेटबिगारी लक्षात घ्यावी, अशी अपेक्षा अनिता माळी यांनी व्यक्त केली.