
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांपूर्वी नोटबंदी जाहीर पाचशे व हजारच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. नोटबंदीमुळे काळ्या पैशावर लगाम लागेल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मात्र नोटबंदीच्या नऊ वर्षानंतरही या जुन्या नोटांचे मोठे घबाड दिल्लीतील मेट्रो स्थानकात सापडलं आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. हर्ष, टेकचंद, लक्ष्य आणि विपिन कुमार अशी त्या चौघांची नावं आहेत.
दिल्लीच्या शालीमार बाग मेट्रो स्थानकात काही लोकं चलनातून रद्द झालेल्या नोटा घाऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दिल्ली पोलीस व आर्थिक गुन्हे विभागाने मेट्रो स्थानकात सापळा रचून नोटा घेऊन आलेल्या चौघांना गेट नंबर 4 जवळून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एका बॅगमध्ये साडे तीन कोटींच्या पाचशे व हजारच्या जुन्या नोटा सापडल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत आरोपींसोबत त्यांनी वापरलेल्या २ कारही जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर फसवणूक, षडयंत्र आणि नोटाबंदी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर चलन त्यांच्याकडे कसे पोहचले याचा शोध पोलीस घेत आहेत





























































