रायगडातील समुद्रकिनाऱ्यांवर दे धम्माल… पर्यटकांचा सूर टीपेला; धूम थर्टी फर्स्टची, मौजमस्ती बच्चे कंपनीची

नाताळची सुट्टी आणि थर्टीफर्स्टची धूम या पाश्र्वभूमीवर रायगडातील समुद्रकिनाऱ्यांवर सध्या दे धम्माल सुरू आहे. बच्चे कंपनी मौजमस्ती करण्यात दंग झाली असून पर्यटकांचा सूरही टीपेला पोहोचला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांसह प्रसिद्ध मंदिरे, किल्ले आणि रिसॉर्ट येथेदेखील पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई आतुर झाली असून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफरची लयलूट सुरू आहे.

थंडगार वारे आणि उसळत्या लाटा

रायगडातील अलिबाग, नागाव, अक्षी, वर्सोली, मुरुड, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगर, हरिहरेश्वर या समुद्रकिनाऱ्यांची पर्यटकांना भुरळ पडली आहे. या किनाऱ्यांवरील थंडगार वारे आणि उसळत्या लाटा अंगाखांद्यावर घेण्यासाठी जणू स्पर्धाच रंगली आहे. बोटिंग, घोडागाडी, बाईक राईडची मजा तरुणाई लुटत आहे.

मुरुड-जंजिरा, कुलाबा, रायगड किल्ल्यावरही गर्दी

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. काही शिवभक्त पायरीमार्गे तर काहीजण रोप वेला पसंती देत असून मुरुड-जंजिरा, कुलाबा या किल्ल्यांना भेट देण्यासाठी झुंबड उडाली आहे.

खांदेरी किल्ल्यावर उद्या विजय दिन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला खांदेरी किल्ल्याचा युनेस्कोचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर १९७९ या दिवशी खांदेरी जलदुर्ग येथे मराठ्यांचे आरमार व इंग्रज यांच्यात युद्ध झाले होते. त्यात मराठा आरमाराने विजय मिळवला. या घटनेचे औचित्य साधून बुधवार ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता विजय दिन साजरा करण्यात येणार आहे.