कठुआ, उन्नाव प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांना ४० लाखांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

कठुआ आणि उन्नाव प्रकरणातील बलात्कार पीडित मुलींच्या कुटुंबीयांना १५०० पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊन जनता फंडच्या माध्यमातून ४० लाखांची मदत केली आहे.

१४ एप्रिल रोजी या अभियानाला सुरुवात झाली होती आणि काही दिवसातच अभियानाला यश आले असून त्यांनी त्यांचे लक्ष्य गाठले. त्यानंतर प्रत्येकी १८ लाख रुपयांची रक्कम ही दोन्ही कुटुंबियांच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली आहे. तसेच उर्वरित रक्कम औपचारिक प्रकिया आणि कर भरण्यासाठी खर्च करण्यात आली आहे. या जमा केलेल्या रक्कमेमध्ये सर्वात जास्त ६० हजाराची देणगी देण्यात आली आहे, तर अनेकांनी ५० आणि ५१ हजाराच्या देणग्या देऊन मदत केली आहे. २५ एप्रिल रोजी कठुआ पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या खात्यात हा निधी हस्तांतरित करण्यात आला. तसेच २५ मे रोजी उन्नाव प्रकरणातील कुटुंबीयांचे या निधी संदर्भातील सर्व व्यवहार हे पूर्ण करण्यात आले.

कठुआ पीडित कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मदत म्हणून त्यांना मिळालेले पैसे ते बकरवाल जमातीतील मुलींसाठी शाळा सुरू करण्यासाठी वापरणार आहेत. क्राऊडफंडिंग वेबसाइट केट्टोच्या मोहिमेचे सह-संस्थापक आणि संचालक आनंद मंगनाळे यांनी ही माहिती दिली. मुलांना चांगले शिक्षण मिळावे अशी बकरवाल जमातीतील लोकांची अपेक्षा आहे. त्यामुळेच आम्ही त्यांना आर्थिक सहाय्य करून मदत करू, असं त्यांनी म्हटलं आहे. कठुआ आणि उन्नाव प्रकरणातील कुटुंबीयांना करण्यात आलेल्या मदतीसाठी अनेक लोकांनी पुढाकार घेतला. तसेच जवळपास १,५७५ लोकांनी एकत्र येऊन ४० लाखांची मदत केल्याचही त्यांनी सांगितलं.

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबातील एका सदस्यांने क्राउडन्यूझिंगच्या सहसंस्थापक बिलाल झैदी यांनी या मदतीच्या अभियानाची सुरुवात केल्याचं सांगितलं. तसेच जमा झालेली रक्कम आमच्या खात्यात एक आठवड्यापूर्वी हस्तांतरीत करण्यात आली आहे. मात्र अद्याप या पैशाचे काय करायचे याचा विचार कुटंबीयाने केलेला नाही. तसेच आम्ही उन्नव प्रकरणासंदर्भात कायदेशीर लढाई लढत आहेत त्यामुळे मिळालेली मदती त्यासाठीच खर्च करू असंही त्यांनी सांगितलं.