मानखुर्दमध्ये जमावाकडून गाड्यांची तोडफोड, दोन्ही बाजूच्या सात जणांना ताब्यात घेतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारी राम नवमी सर्वत्र मोठय़ा उत्साहात साजरी होत असताना मानखुर्द येथे एक अनुचित प्रकार घडला. 20 ते 30 वयोगटातील 40 ते 45 तरुणांच्या जमावाने अक्षरशः धिंगाणा घातला. तलवारी, लाकडी बांबू, अॅल्युमिनियमचे पाईप हातात घेऊन त्या जमावाने रस्त्यावरील वाहनांची यथेच्छ तोडफोड केली. यामुळे साठे नगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मानखुर्दच्या म्हाडा कॉलनीतून दोन तरुण आरडाओरड करत दुचाकीवरून जात होते. त्या वेळी साठे नगरातील काही तरुणांनी त्यांना हटकले व शांततेत जाण्यास सांगितले. त्या वेळी बाचाबाची होऊन दुचाकीवरील तरुणांना मारहाण करण्यात आली. मारहाण झाल्याने मारणाऱयांना धडा शिकवायला ते दोघे 40 ते 45 तरुणांना जमा करून साठे नगरात घेऊन आले. मात्र तोपर्यंत मारहाण करणाऱया तरुणांनी तेथून पळ काढला होता. त्यामुळे जमावाने आपला राग परिसरातील गांडय़ांवर काढण्यास सुरुवात केली. तलवारी, बांबू, अॅल्युमिनियमचे पाईप घेऊन आलेल्या तरुणांनी दुचाकी, चारचाकी व रिक्षांची तोडपह्ड करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण होऊन दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पण हा प्रकार कळताच मानखुर्द पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जमाव अधिक हिंसक होण्याआधीच पोलिसांनी त्यांना शांत केले. आज पहाटे या प्रकरणी दोन्ही गटाविरोधात गुन्हे दाखल करून सात जणांना ताब्यात घेतल्याचे मानखुर्द पोलिसांनी सांगितले.

राज्यात जाती-धर्माच्या नावाखाली दंगल भडकवण्याचा प्रयत्न – दिलीप वळसे-पाटील 

राज्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे दोन धर्मांमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रात जाती-धर्माच्या नावाखाली दंगल भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केला आहे. मानखुर्दमध्ये रामनवमीच्या दिवशी काही तरुणांनी गोंधळ घातल्याची घटना घडली. यासंदर्भात बोलताना गृहमंत्री म्हणाले, घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून लोकांना शांतता राखावी. दंगलखोरांवर कठोर कारवाई केली जाईल.