Pulwama सीआरपीएफने हवाई प्रवासाची केली होती मागणी, गृह मंत्रालयाने केले दुर्लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यामुळे सध्या संपूर्ण देशात असंतोषाचे वातावरण आहे. या सगळ्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीआरपीएफने आठवड्याभरापूर्वी हवाई मार्गाने श्रीनगरमध्ये जाण्याची मागणी केली होती. या मागणीकडे गृह मंत्रालयाने साफ दुर्लक्ष केले. परिणामी जवानांना ट्रकने प्रवास करावा लागला. द क्विंटने याबाबत वृत्त दिले असून एका सीआरपीएफ जवानाने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचे वेबसाईटने म्हटले आहे.

द क्विंट ने दिलेल्या वृत्तानुसार श्रीनगरमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सीआरपीएफच्या मुख्य कार्यालयाला पत्र लिहून ही मागणी केली होती. सीआरपीएफने हे पत्र गृह मंत्रालयाकडे वर्ग केले होते.सीआरपीएफने आधीही जवानांसाठी हवाई यात्रेची मागणी केली होते परंतु ती कधीच केंद्र सरकारकडून स्वीकारली नाही. सीआरपीएफच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने क्विंटशी बोलताना म्हटले की, “हिमवर्षावामुळे रस्ते बंद झाले होते. त्यामुळे जवान अडकले होते. 4 फेब्रुवारी रोजी जवानांची एक तुकडी निघाली होती. सीआरपीएफने केंद्र सरकारकडे हवाई यात्रेची मागणी केली परंतु या मागणीवर कुठलेच उत्तर आले नाही.”

प्राथमिक अहवालानुसार 8 फेब्रुवारी रोजी गुप्तचर विभागाने सीआरपीएफला पत्र लिहून दहशतवादी हल्ल्याची पूर्वकल्पना दिली होती. गुप्तचर विभागाने फक्त आयईडी स्फोटाची माहिती दिली होती इतर माहिती त्यांनी दिली नव्हती.