
केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) महिला कमांडोही आता प्रत्यक्ष नक्षलवादविरोधी मोहिमेत मैदानात उतरायला सज्ज होत आहेत. या मोहिमेसाठी सीआरपीएफच्या 6 महिला बटालियनच्या 34 महिला जवानांना 3 महिन्यांचे कोब्रा प्री इंडक्शन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या महिला कमांडोजचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुरुष जवानांसोबत प्रत्यक्ष नक्षलविरोधी चकमकीत सहभागी करून घेण्यात येणार आहे. 1986 मध्ये 6 फेब्रुवारीला सुरक्षा दलातील पहिल्या महिला बटालियनची स्थापना करण्यात आली होती. या स्थापना दिवसाच्या निमित्ताने आता सीआरपीरएफच्या कोब्रा बटालियनमध्ये 30 महिलांनाही समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता सीआरपीएफचे महिला ब्रास बॅण्ड पथक तयार करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

























































