
सामना ऑनलाईन । येवला
विदर्भातील वाशिम जिह्यातील कारंजा येथील बीएसएफचे जवान सुनील धोपे यांचा मेघालयात शिलाँग येथे घातपाताने मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजत असतानाच महाराष्ट्रातील मानोरी (ता. येवला-नाशिक) येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर शेळके यांचा आसाम तेजपूर येथेही घातपाताने मृत्यू झाला आहे, असा आरोप करीत या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही कुटुंबियांनी केली आहे.
तेजपूर येथे असलेल्या सीआरपीएफ कॅम्पमधील स्टोअर विभागाचा दिगंबर शेळके यांना एक महिन्यापूर्वीच चार्ज देण्यात आला होता. 2014 पासून स्टोअर विभागात मोठा घोटाळा झाला असल्याचे त्यांनी कुटुंबीयांना 14 सप्टेंबर 2018 रोजी फोनवर सांगितले होते. तसेच वरिष्ठ अधिकाऱयांनाही स्टोअरमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याची माहिती शेळके यांनी दिली. परंतु वरिष्ठ अधिकाऱयांनी घोटाळय़ातून आपला बचाव करण्यासाठी ही हत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व दिगंबर शेळके यांना शहीदाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शेळके यांच्या कुटुंबीयांनीही अशीच मागणी केली आहे.
तोपर्यंत पार्थिव स्वीकारणार नाही
दरम्यान, आज येथील ग्रामस्थांनी एकत्र येत मुखेड फाटय़ावर रास्ता रोको करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर कुटुंबीयांकडून या घटनेसंदर्भात केंद्रीय गृहखात्याकडून सखोल चौकशी करून न्याय मिळत नाही तोपर्यंत कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी पार्थिव न स्वीकारण्याचा पवित्रा घेतला आहे.

























































