आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 30 टक्क्यांनी कमी झाल्या अहेत. रशियासोबत प्राईस वॉरमुळे सौदी अरेबियाने या किंमती घटवल्या आहेत. 1991 नंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत ही सर्वाधिक घट आहे. तसेच कोरोना वायरसमुळे कच्च्या तेलाची मागणी कमी झाली आहे, त्यामुळेही किंमत कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तेलाची मागणी जरी कमी झाली तर पुरवठा तितका आहे. त्यामुळे तेल निर्यातक संगठना ओपेक आणि सहकारी तेल उत्पादित देशांची बैठक बोलावली होती. या बैठकीत तेलाच्या किंमतीवर चर्चा झाली परंतु त्यात कुठलाच निर्यण घेता आला नाही.
सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमती घटल्याने एका बॅरेलची किंमत 31.2 डॉलर इतकी झाली आहे. 17 जानेवारी रोजी पहिले आखाती युद्ध झाले तेव्हा आणि 12 फेब्रुवारी 2016 नंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत ही सर्वाधिक घट आहे.
कच्च्या तेलाच्या किंमती घटल्याने आता पेट्रोल डीझेलच्या किमंतीही घटू शकतात. यामुळे पेट्रोल डिझेल 5-6 रुपयांनी स्वस्त होऊ शकतं असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने पेट्रोल डिझेल अजून स्वस्त होऊ शकत नाही असेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
जगात सौदी अरेबिया हा देश सर्वाधिक तेल उत्पादन करणारा देश आहे. त्यानंता रशियाचा क्रमांक लागतो. कोरोना वायरसमुळे संपूर्ण जगात तेलाची मागणी कमी झाली आहे. म्हणून ओपेक मधील देशांनी रशियाला उत्पादन घटवण्यास सांगितले होते. रशियाने हा प्रस्ताव धुडकावून लावला. म्हणून रशियाला धडा शिकवण्यासाठी सौदी अरेबियाने आपल्या तेलाच्या किंमती 30 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात प्राईस वॉर सुरू झाले आहे.



























































