
देशात क्रिप्टोकरन्सी अर्थात आभासी चलनाला मान्यता मिळणार का ? असा प्रश्न विचारला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिप्टोकरन्सीबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे. पंतप्रधानांनी या मुद्दावरून चिंता व्यक्त करताना म्हटले की बिटकॉईन चुकीच्या लोकांच्या हाती जाऊन नये , कारण असं झाल्यास तरुण बरबाद होऊ शकतात.
सिडनी संवादामध्ये पंतप्रधानांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाग घेतला. यामध्ये त्यांनी क्रिप्टोकरन्सीबाबतची ही चिंता व्यक्त केली. सिडनी संवाद 17 ते 19 नोव्हेंबरदम्यान आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या धोरण योजना संस्थेने या संवादाचे आयोजन केले आहे. तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या संधी आणि संकटांसंदर्भात एकमत निर्माण व्हावे यासाठी या संवादाचे आयोजन केले आहे.
या संवादादरम्यान बोलताना पंतप्रधानांनी म्हटले की लोकशाहीची सर्वात मोठी ताकद ही खुलेपणा आहे. याचा ठराविक लोकांनी गैरफायदा घेऊ नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबतचे उदाहरण देत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की ‘क्रिप्टोकरन्सी किंवा बिटकॉईनचेच उदाहरण घेऊयात. लोकशाही असलेल्या सगळ्या राष्ट्रांनी याबाबत एकत्र येऊन काम केले पाहिजे आणि हे सुनिश्चित केले पाहिजे की ‘हे’ चुकीच्या हातांमध्ये जाऊ नये, कारण असं झाल्यास तरुण बरबाद होऊ शकतात.’
Take crypto-currency or bitcoin for example.
It is important that all democratic nations work together on this and ensure it does not end up in wrong hands, which can spoil our youth: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 18, 2021




























































