
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १६ चे सहा महिन्यांपूर्वी हाती घेतलेले काम अद्याप रडतखडत सुरू आहे. या कामासाठी घेतलेल्या रेल्वेच्या ब्लॉकला तब्बल पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली; तरीही काम पूर्णत्वास गेलेले नाही. या अर्धवट कामाचा काही एक्स्प्रेस गाड्यांच्या सेवेवर मोठा परिणाम झाला असून गणेशोत्सवासाठी तेजस एक्स्प्रेसने कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.
सीएसएमटीचा पुनर्विकास करण्याच्या नावाखाली रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. यात कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेस सुटणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक १६ चा समावेश करण्यात आला असून फेब्रुवारीमध्ये हे काम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी पहिल्यांदा १ फेब्रुवारी ते २६ एप्रिलदरम्यान ब्लॉक घोषित केला होता. मात्र, संथगतीने चालणाऱ्या कामांमुळे रेल्वेने आधी १९ मे, त्यानंतर १३ जून, ५ ऑगस्ट, २१ ऑगस्ट आणि नंतर ५ सप्टेंबरपर्यंत या ब्लॉकला मुदतवाढ दिली आहे.
अलीकडेच जाहीर केलेल्या ब्लॉकची मुदत संपत आली तरी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर अर्धवट स्थितीत आहे. पुढील चार दिवसांत काम पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने गणेशोत्सव काळात तेजस एक्स्प्रेसने कोकणचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. सीएसएमटीत प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे ही गाडी आणखी काही काळासाठी सीएसएमटीऐवजी दादर येथूनच चालवली जाण्याची चिन्हे आहेत.
इतर एक्स्प्रेसच्या सेवेवर परिणाम
सीएसएमटीतील प्लॅटफॉर्मचा विस्तार रखडल्यामुळे तेजस एक्स्प्रेसप्रमाणेच हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस या गाड्यांचा प्रवास सीएसएमटीऐवजी दादर स्थानकात समाप्त केला जात आहे. तसेच मंगळुरू-सीएसएमटी एक्स्प्रेस सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंतच चालवण्यात येत आहे. त्यामुळे पुढचा प्रवास लोकल ट्रेनने किंवा रस्तेमार्गे खासगी वाहनाने करताना प्रवाशांची दमछाक होत आहे.



























































