
मुंबईची वाहतूककाोंडी भेदून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून प्रवाशांना सुसाट चेंबूरपर्यंत उतरवणाऱ्या फ्री वेचा विस्तार आता थेट ठाण्यापर्यंत होणार आहे. हाच एलिव्हेटेड रस्ता पुढे साकेत ते खारेगावपर्यंतदेखील वाढवणार असल्यामुळे गायमुख ते मुंबईपर्यंत वेगाने प्रवास करता येईल. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एमएमआरडीएच्या संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली आहे. खारेगाव बायपास, कोपरी-पटणी खाडीपुलालाही मान्यता दिली असून एमएमआरडीएने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
सध्या इस्टर्न फ्री वे शिवाजीनगर येथे समाप्त होतो. मात्र त्यानंतर ठाण्यापर्यंत येताना मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे छेडानगर ते ठाण्यापर्यंत या फ्री वेचा विस्तार करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले होते. त्यानुसार एलिव्हेटेड फ्री वेचा विस्तार ठाण्यात आनंदनगर ते साकेत-खारेगाव असा होणार आहे.



























































