
रेल्वेने विकसित केलेल्या एका अॅपमुळे ‘पीआरएस’च्या छापिल तिकीटांची देखील दूरअंतरावरून तपासणी करणे शक्य झाले आहे. आतापर्यंत युटीएस ई-तिकिटांचा ‘क्यूआर’ कोड तपासणे मोबाईलने शक्य होत होते, परंतू नव्या ‘चेक इन ऍप’ मुळे छापिल लांब पल्ल्याच्या ‘पीआरएस’ तिकिटांची तपासणी करणे शक्य झाले आहे.
मध्य रेल्केच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांची तिकीट तपासणी सुरक्षित अंतरावरुन करणे शक्य झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आव्हान टीसी आणि सुरक्षारक्षक इतर स्टाफवर आहे. त्यामुळे योग्य अंतरावरुन तिकीट तपासणी निर्धेकपणे व्हावी यासाठी मध्य रेल्वेने ‘चेक इन मास्टर’ नावाचे अॅप विकसित केले आहे. हे ऍप टीसींच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यात आले आहे. त्यामुळे पीआरएस आणि यूटीएस तिकिटांची तपासणी ‘विनास्पर्श’ करता येणे शक्य झाले आहे.
मेट्रोप्रमाणे ‘फ्लॅप गेट’ने प्रवेश
मध्य रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या टर्मिनसवर लवकरच मेट्रोप्रमाणे ‘फ्लॅप गेट’ने ‘क्यूआर’ स्कॅन करून प्रवेश देण्यात येणार आहे. सुरुवातीला मध्य रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाडय़ा सुटणाऱया टर्मिनसवर ‘फ्लॅप गेट’ बसविण्याची योजना आहे. हे काम मेसर्स रूरल इलेक्ट्रीफिकेशन कॉर्पेरेशन लिमिटेड ही कंपनी ‘सीआरएस’ फंडातून करणार आहे.






























































