
तालुक्यातील हेब्बाळ येथे गांजाची शेती केल्याचे उघडकीस आले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत एकूण 75 गांजाची झाडे जप्त केली. 107 किलो 400 ग्रॅम वजनाचा 7 लाख 57 हजार रुपयांचा गांजा आहे. तालुक्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. याप्रकरणी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
विष्णू पिरापगोळ आणि काशाप्पा पिरापगोळ (रा. हेब्बाळ, ता. गडहिंग्लज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
गडहिंग्लज-संकेश्वर या आंतरराज्य मार्गावर हेब्बाळ येथे हसुरचंपू रोडजवळ शेतात विष्णू पिरापगोळ व काशाप्पा पिरापगोळ यांनी ऊस पिकात गांजाची लागवड केल्याची खबर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (एलसीबी) मिळाली होती. यानुसार या पथकाने शुक्रवारी सायंकाळी या ठिकाणी अचानक छापा टाकून 75 गांजाची झाडे जप्त केली.
ही गांजाची झाडे सात ते आठ फूट उंचीची होती. छापा पडताच यातील संशयित फरार झाले आहेत. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वीच गडहिंग्लज पोलिसांनी तालुक्यात गांजाविरोधी मोहीम राबवून कारवाईदेखील केली होती. मात्र, हेब्बाळ येथे गांजाचीच शेती सापडल्याने खळबळ उडाली आहे.

























































