
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सोमवारी रात्रीपासून बीड जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या असून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे रस्त्यांवर शुकशुकाट आहे. संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे.
बीडमध्ये 14 पथकांनी बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या 33 हजार लोकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. त्यात एकही पोझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. सोमवारपासून बीड जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या तीन्ही राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट आहे. संचारबंदीमुळे पुणे, मुंबईकडून बीडकडे येणाऱ्यांची गर्दी बंद झाली आहे. जिल्ह्यात 11 विलगीकरण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत. जिल्ह्यात 75 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. गरज भासल्यास खाजगी रुग्णालये ताब्यात घेतले जाऊ शकतात. प्रशासन युद्ध पातळीवर खबरदारी घेत आहे. सोमवार रात्रीपासून जिल्हाभरात संचारबंदी लागू करण्यात आली असून संचारबंदीचे पालन काटेकोर केले जात आहे.
संपूर्ण बीड जिल्हा ठप्प आहे. बीड, वडवणी,परळीमध्ये संचारबंदी असताना रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत संचारबंदी शिथिल केली असली तरी कलम 144 लागू आहे. भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही प्रमाणात गर्दी होत आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. संचारबंदीच्या काळात रस्त्यावर आणि गल्लीत फिरणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँका सुरू असतानाही गर्दी कमी आहे. पेट्रोल पंपावरही शुकशुकाट आहे. नेहमीची वर्दळ असणारी छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोड, जालना रोड, सारडा कॅपिटल, बार्शी रोड , सुभाष रोड, धोंडीपुरा भागात शुकशुकाट होता. शहरासह माजलगाव, वडवणी, परळी, अंबाजोगाई, केज, धारूर,आष्टी, शिरूर, गेवराई, पाटोदा तालुक्यात शासनाचा आदेश पाळला जात आहे.




























































