
पालिका हद्दीमधील झाडांच्या धोकादायक फांद्या यावर्षी अत्याधुनिक पद्धतीने झाडांना इजा न पोहोचवता तोडल्या जात आहेत. यामध्ये क्रेनच्या सहाय्याने फांद्यांपर्यंत पोहोचून केवळ धोकादायक भाग काढून टाकला जात असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. दरम्यान, झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्यासाठी तब्बल 400 अर्ज येत असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पावसाळा सुरू होण्यास अवघे दोन-सवादोन महिने राहिल्याने पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू आहेत. यामध्ये धोकादायक झाडे व झाडांच्या फांद्या पावसाळ्यात धोकादायक ठरत असल्याने त्यांची छाटणी केली जाते. या पार्श्वभूमीवर छाटणीला सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षी पालिकेच्या उद्यान विभागाकडून धोकादायक फांद्या-झाडे आणि मृत झाडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने काढण्याचे काम सुरू आहे. यासाठी हे काम करणाऱया कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दरम्यान, आपले घर, परिसरात धोकादायक फांद्या किंवा झाडे असल्यास पालिकेच्या उद्यान विभागाशी संपर्क साधून परवानगी घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
खासगी क्षेत्रातील झाडांची जबाबदारी मालकाची
सार्वजनिक ठिकाणी असणाऱया झाडांची काळजी घेणे ही पालिकेची जबाबदारी आहे. तर खासगी सोसायटी, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणाऱया झाडांची निगा राखण्याची जबाबदारी ही संबंधित मालकाची आहे. त्यामुळे पावसाळ्यात झाडे पडून जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी संबंधितांनी पालिकेच्या पूर्वपरवानगीने आपल्या परिसरातील वाढलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
वृक्ष छाटणीसाठी शुल्क
2 फुटांपर्यंत घेरा 1,011 रु.
2 ते 5 फुटांपर्यंत घेरा 2,106 रु.
5 फुटांवरील घेरा 4,213 रु.























































