‘बेस्ट ऑफ लक’ टीम इंडिया! आज हिंदुस्थानी संघाचा पहिला पेपर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द्वारकानाथ संझगिरी

दोन सामने लागोपाठ हरलेल्या आणि स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची भीती असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पेपर सोपा म्हणता येईल का?

विश्वचषकात कुठलाच पेपर सोपा नसतो हे आधी बांगलादेशने आणि नंतर पाकिस्तानने दाखवलं. त्याच नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिजवर इंग्लंडविरुद्ध खेळताना पाकिस्तानने विंडीजबरोबर खेळलेल्या पाकिस्तानी संघाशी आपला काहीही संबंध नाही. खेळाडूंच्या चेहऱ्यात फक्त साम्य आहे हे दाखवून दिलं. वनडेत ‘तो दिवस’ महत्त्वाचा ठरतो. तेच डोक्यात ठेवून हिंदुस्थानी संघ खेळेल. नव्हे खेळावं.

हिंदुस्थानी संघाचा अभ्यास जोरदार सुरू होता. आपला पहिला पेपर इतरांपेक्षा खूप उशिरा असल्यामुळे अभ्यासाला जास्त वेळ मिळाला. अलीकडे सरावाच्या पद्धती बदलल्या आहेत. पूर्वी भर फक्त नेट प्रॅक्टिस आणि झेलाच्या प्रॅक्टिसवर असे. सर गारफिल्ड सोबर्सला नेट प्रॅक्टिस आवडायची नाही, पण मॅचमध्ये पेपर लिहिताना त्याला काहीही फरक पडायचा नाही. सुनील गावसकर म्हणतो की, त्याला मैदानाला धावत एक फेरी मारणं जिवावर यायचं, पण मॅचमध्ये फलंदाजी करताना तो दिवसभर लीलया उभा रहायचा. पूर्वी पत्रकार, ‘खेळाडूंनी कसून सराव केला’ असं सरावाने लिहून जात. आता त्या ‘कसून’चा अर्थ अधिक खडतर झालाय. तरीही कठीणप्रसंगी माणसं माणसासारखीच वागतात. ती देव होत नाहीत. इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध असं क्षेत्ररक्षण केलं की, इंग्लिश संघ क्रिकेटच्या द्वापार युगातला आहे असं वाटावं.

हिंदुस्थानी संघाच्या सरावाच्या वेळी विराट कोहलीने गोलंदाजीचाही सराव केला. त्याने तो गंमत म्हणून केला असेल तर माझं काहीही म्हणणं नाही, पण आपल्यावर गोलंदाजी टाकायची वेळ येऊ शकते ही त्याची धारणा असेल तर ही चांगली बातमी नाही. मग कुठल्या आधारावर हिंदुस्थानकडे उत्तम गोलंदाजी आहे असं म्हणायचं? खासदार गौतम गंभीर गंभीरपणे म्हणतो की, हिंदुस्थानने एक वेगवान गोलंदाज दौऱ्यावर कमी नेलाय. हिंदुस्थानचे सहा सामने लंडनच्या उत्तरेला आहेत. तिथे वातावरण थंड असू शकतं, ढगाळ असू शकतं. अशावेळी तीन वेगवान गोलंदाज खेळवायला लागणार. आपल्याकडे आता साडेतीन वेगवान गोलंदाज आहेत. त्यांच्यावर दबाव पडणार नाही का? मी हार्दिक पांडय़ाला ‘अर्धा गोलंदाज’ म्हटलंय. हा विश्वचषक संपेपर्यंत तो ‘पूर्ण गोलंदाज’ झाला तर आनंदच आहे, पण नाही झाला तर.. देव न करो, पण तीनपैकी एक जायबंदी झाला तर… देवाने भुवनेश्वर कुमारला इंग्लंडमध्ये खेळण्यासाठीच जन्माला घातलं असं नेहमी वाटतं. कारण त्याचं चेंडू हलवण्याचं कौशल्य खास इंग्लिश वातावरणासाठीच आहे, पण गेल्या काही महिन्यांत त्याचा फॉर्म डळमळत आहे. मला फिरकीची काळजी नाही, पण पाच अस्सल गोलंदाज आपण खेळवू शकत नाही. कारण आपलं हे गोलंदाज खाली फार धावा करू शकत नाहीत. इतर संघांत वेगळं चित्र आहे. टी-20 आणि वनडेत अलीकडे गोलंदाजांकडूनही धावांच्या अपेक्षा ठेवाव्या लागतात.

त्यात आपली फलंदाजी ही उलटय़ा पिरॅमिडसारखी आहे. फार मोठी भिस्त धवन, रोहित शर्मा आणि विराट. चौथा राहुल अजून ‘प्रोबेशन’वर आहे. तो परमनंट नाहीए. मग अष्टपैलू खेळाडू सुरू होतात. उदा. धोनी, मग पांडय़ा, मग फिट असेल तर जाधव आणि मग चार गोलंदाज. त्यात फक्त भुवनेश्वर काही प्रमाणात फलंदाजी करू शकतो. त्यामुळे एखादा फलंदाज वाढवायची वेळ आली तर गोलंदाजीची जबाबदारी कुणावरही येऊ शकते.

रवी शास्त्रीने इंग्लंडमध्ये एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलंय. ‘‘आम्ही खेळपट्टी बघून ठरवणार नाही, वातावरण पाहून संघ ठरवणार.’’ एखाद्या खेळपट्टीवरचं थोडं गवत सोडलं, तर इंग्लंडमध्ये वातावरण म्हणजे ढग, वारा, पाऊस वगैरे फार मोठा परिणाम करतात. खेळपट्टय़ा यावेळी आयसीसीने बऱ्याच पाटा बनवल्या आहेत हे दिसतं. वातावरण जर ढगाळ असेल तर टॉस जिंकण्यावर काय करायचं यावर विचारविनिमय लागेल, पण एरवी ऊन असेल आणि खेळपट्टी ठणठणीत, तर फलंदाजी घेऊन धावा उभारणं उत्तम. कारण एकदा धावसंख्या 330 च्या पुढे गेली की, पाठलाग सोपा राहत नाही. इंग्लंडकडे सध्या सर्वोत्कृष्ट फलंदाजी आहे. त्यांनी पाकिस्तानला याआधी तीनशेच्या वर पाठलाग करून इंग्लंडमध्येच अनेकदा हरवलं, पण विश्वचषक हा विश्चषक असतो. सर्वोच्च स्टेज, त्याचा सर्वोच्च दबाव!

चला, परीक्षेच्या हॉलमध्ये शिरणाऱ्या हिंदुस्थानी संघाला ‘बेस्ट ऑफ लक’ देऊया आणि एखादा पेपर कठीण गेला तरी खंबीरपणे पाठी उभं राहण्याची ग्वाही. कारण पाकिस्ताननं सिद्ध केलंय. फिनिक्स पक्षी जुना झाला. आता म्हणावं लागतं, पाकिस्तानप्रमाणे राखेतून उभा राहिला. आपणही ती किमया करू शकतो.