रशियन लसीची चाचणी घेणाऱया डॉ. रेड्डीज कंपनीवर सायबर हल्ला, जगभरातील शाखांचे काम थांबवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनावर रशियाने काढलेल्या ‘स्पुटनिक-व्ही’ या लसीची चाचणी घेण्याची परवानगी मिळालेल्या डॉ. रेड्डीज या औषधी कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे. सायबरचोरांनी कंपनीचा महत्त्वाचा डाटा पळवला आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या जगभरातील शाखांचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. रेड्डी ही देशातील औषध उत्पादन करणारी नामांकित कंपनी आहे. या कंपनीला रशियन कोरोना लसीची चाचणी घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावर कंपनीचे काम युद्धस्तरावर चालू असतानाच आज कंपनीवर अचानक सायबर हल्ला झाला. त्यामुळे अनेक शाखांचे कामकाज ठप्प झाले. यापूर्वीही कंपनीच्या सर्व्हरमधून डाटा चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर कंपनीने तातडीने अमेरिका, ब्रिटन, ब्राझील, रशिया व हिंदुस्थानातील शाखांचे कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सीईओ मुकेश राठी यांनी दिली. लवकरच सर्व सेवा पूर्ववत होतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. डॉ. रेड्डीज कंपनीवर सायबर हल्ला झाल्याचे कळताच शेअरबाजार कोसळला. मुंबई शेअरबाजारात दुपारी साडेबारा वाजता कंपनीच्या शेअरमध्ये 1.49 टक्क्यांची घसरण बघायला मिळाली. सध्या कंपनीच्या एका शेअरचा भाव 4971 रुपये आहे. राष्ट्रीय शेअरबाजारातही कंपनीचा भाव दीड टक्क्यांनी कोसळला.

ब्राझिलमध्ये कोरोना लसीच्या चाचणीवेळी स्वयंसेवकाचा मृत्यू

कोरोना लसीची क्लिनिकल चाचणी सुरू असताना स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याची घटना ब्राझिलमध्ये घडली. तेथील एविसा या आरोग्य यंत्रणेने ही माहिती दिली. एस्ट्राजेनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामार्फत विकसित केल्या जात असलेल्या लसीच्या चाचणीवेळी ही घटना घडली. या घटनेनंतरही चाचणी सुरूच राहणार असल्याचे एविसाने स्पष्ट केले.

मृत्यू झालेल्या स्वयंसेवकाला लस वा प्लेसबोचा डोस देण्यात आला होता का, हे अजून उघड झालेले नाही. याबाबत एविसाकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. कोरोना लसीच्या चाचणीत सहभागी होणाऱया सर्व ग्रुपच्या स्वयंसेवकांची सर्वतोपरी खबरदारी घेतली जाते. प्रत्येक स्वयंसेवकाच्या तब्येतीचा स्वतंत्रपणे आढावा घेतला जातो. नियामक संस्थेच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे कोरोना लसीच्या चाचणीच्या सुरक्षेबाबत चिंतेचे कारण नाही, असे स्पष्टीकरण ऑक्सफर्ड विद्यापीठामार्फत देण्यात आले आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये ब्रिटनमध्ये चाचणीदरम्यान एका स्वयंसेवकाला रुग्णालयात हलवावे लागले होते.