सायबर हल्ल्याचा नवा प्रकार, फोटो पाहून पत्रकाराला आकडी आली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेमध्ये जॉन रिव्हेलो नावाच्या आरोपीविरोधात खटला चालवण्यात येत आहे. सोमवारी या खटल्याची सुनावणी होती. रिव्हेलो हा त्याचा गुन्हा येत्या काही दिवसांत कबूल करण्याची शक्यता आहे. त्याने असे केल्यास चित्रपटात शोभेल असा एक सायबर हल्ला प्रत्यक्षातही होऊ शकतो याच्यावर लोकांचा विश्वास बसेल. त्याने एका पत्रकाराला GIF चित्र पाठवलं होतं, ते पाहून त्या पत्रकाराला आकडी आली होती.

कर्ट आयशेनवाल्ड असं या पत्रकाराचे नाव आहे. त्याला रिव्हेलोने ट्विटरवरून एक चित्र पाठवलं होतं. हे चित्र पाहताच कर्टला आकडी आली होती. एका चित्राचा शस्त्रासारखा रिव्हेलोने कर्टवर हल्ला करण्यासाठी वापर केला असेल असं कोणाला वाटलंही नव्हतं. रिव्हेलोने एक झगझगीत प्रकाशाचा झोत असलेले हलते चित्र कर्टला पाठवले होते. ते पाहता क्षणीच कर्टला आकडी आली. या चित्रासोबतच रिव्हेलोने कर्टला मेसेज पाठवला होता, ज्यात त्याने म्हटले होते की ‘तू जी मतं मांडतो आहेस त्यासाठी तुला आकडी यायलाच पाहिजे’ रिव्हेलोने कर्टच्या काही मित्रांनाही ट्विटरवरून संदेश पाठवला होता ज्यात त्याने म्हटले होते की ‘मला खात्री आहे की यामुळे त्याला नक्की आकडी येईल’

कर्टने The New York Times साठी दीर्घकाळ पत्रकारिता केली आहे. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांच्यावर कर्टने सातत्याने टीका केली होती आणि त्यांच्याविरोधात पुष्कळ लिखाण केलं होतं. यामुळे चिडलेल्या रिव्हेलोने त्याला धडा शिकवायचं ठरवलं होतं. रिव्हेलो हा कट्टर ज्यूविरोधी असावा असं न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमुळे वाटते आहे. 2016 मध्ये रिव्हेलोने कर्टला जीवघेणा मेसेज पाठवला होता. या मेसेजसाठी त्यासा 2017 साली अटक करण्यात आली.

कर्टला जीवघेणा मेसेज पाठवणे हे टपालाद्वारे अँथ्रेक्सचे विषाणी पाठवल्यासारखेच आहे असं कर्टच्या वकिलांनी न्यायालयात झालेल्या युक्तिवादादरम्यान म्हटले. कर्टने न्यायालयात बोलताना म्हटले की जेव्हा त्याने रिव्हेलोने पाठवलेला कॉम्प्युटरवर मेसेज उघडला तेव्हा त्याला आकडी आली आणि जवळपास 8 मिनिटे तो तडफडत होता. कर्टला आकडी आल्यानंतर काही मिनिटांमध्ये कर्टची बायको तिथे आली. तिने कर्टसाठी 911 सेवेला फोन केला आणि कर्टच्या मोबाईलच्या सहाय्याने कॉम्प्युटरवरील चित्राचा फोटो काढला.