ऑनलाइन फीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक, सायबर भामट्याचा फसवणुकीचा नवा प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

नोकरीकरिता संकेतस्थळावर अर्ज केल्यावर तुम्हाला जर कमी ऑनलाइन शुल्क भरण्यास सांगत असल्यास सावधान! कमी ऑनलाइन शुल्काच्या नावाखाली सायबर भामट्याचा आर्थिक फसवणुकीचा नवा प्रकार उघड झाला आहे.

तक्रारदार युवतीने नोकरीकरिता ऑनलाइन बायोडेटा अपलोड केला होता. एप्रिल महिन्यात तिला एक फोन आला. एका प्रसिद्ध कंपनीतून बोलत असल्याचे भासवले. ‘तुमचा बायोडेटा पहिला, तुम्हाला कंपनीमध्ये नोकरी मिळणार आहे’ असे सांगितले. ‘तरीही तुम्ही एका संकेतस्थळावर जाऊन अर्ज करा. अर्ज करण्याकरिता तुम्हाला 30 रुपये ऑनलाइन शुल्क भरावे लागेल’ असे भासवण्यात आले तेव्हा युवतीने आपण नंतर कळवू असे त्या फोन करणाऱ्याला सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा युवतीला फोन आला.

एका संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरा असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून युवतीने संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरला. ऑनलाइन शुल्क भरण्याकरिता तिने ट्रान्झॅक्शन केले. त्यानंतर तिला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) आला. युवतीने पुन्हा रीओटीपीसाठी अप्लाय केला तेव्हा युवतीच्या बँक खात्यातून तीन हजार रुपये गेल्याचा तिच्या मोबाईलवर मेसेज आला. हा प्रकार संशयास्पद वाटल्यामुळे युवतीने त्या फोन करणाऱ्या महिलेशी संपर्क साधला. याच दरम्यान सायबर भामट्याने युवतीची एक लाख रुपयांची फसवणूक केली. फसवणूकप्रकरणी युवतीने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कमी शुल्कामुळे होऊ शकतो घात
नोकरीकरिता संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्यास सांगतात. नोंदणीच्या नावाखाली 30 ते 50 रुपये असे शुल्क भरण्यास सांगितले जाते. जर जास्त शुल्क सांगितल्यास संशय येईल. त्यामुळे भामटे हे कमीत कमी ऑनलाइन शुल्क भरण्यास सांगतात. ऑनलाइन ट्रान्झॅक्शनच्या वेळेस नोंदणी शुल्क कमीच दिसते.

ऑनलाइन व्यवहार करताना ओटीपी कोणालाही देऊ नये. ओटीपीबाबत नागरिकांनी खबरदारी बाळगावी. – ऍड. प्रशांत माळी, सायबरतज्ञ