महागडय़ा सायकल चोरणाऱ्या तरुणाला पोलिसांचा ब्रेक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

इमारतीखाली उभ्या केलेल्या महागडय़ा सायकली चोरून नेणाऱ्या तरुणाला पवई पोलिसांनी ब्रेक लावला आहे. रहेजा विहार परिसरात सायकल चोरण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याने चोरलेल्या तब्बल १७ महागडय़ा सायकल पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

मरोळ येथे राहणारे ज्युजर भारमल या व्यावसायिकाच्या मुलाची फॉरमंट कंपनीची महागडी सायकल पवई येथे चोरीला गेली होती. त्यामुळे पवई पोलीस ठाण्यात त्याची तक्रार देण्यात आली होती. सायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पोफळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद लाड, अंमलदार घोडेकर, पालांडे, देसाई आदींचे पथक शुक्रवारी गस्त घालत असताना त्यांना रहेजा विहार येथील शेफानी इमारतीजवळ एक तरुण संशयास्पद फिरताना सापडला. त्यामुळे पोलिसांनी त्याला हटकले असता तो पळू लागला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात आणले व चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मोहम्मद आरीफ मोहम्म्द शरीफ अन्सारी (२५) असे सांगितले. तसेच त्याने गेल्या तीन महिन्यांत पवई, मरोळ नाका, जे. बी. नगर, एमआयडीसी, अंधेरी येथून चोरलेल्या महागडय़ा सायकली चिमटपाडा येथील रहिवाशांना विकल्याचे चौकशीत कबूल केले. त्यानुसार पोलिसांनी चिमटपाडा येथील रहिवाशांकडून एक लाख ४ हजार किमतीच्या एकूण १७ सायकली हस्तगत केल्या.