वर्किंग फ्रॉम सायकल- तिघा मित्रांची भन्नाट कल्पना, ऑफिसचं काम करत कल्याण ते कन्याकुमारी प्रवास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनच्या आठ महिन्यांत आपण सारे घरात अडकलो. कुठेही फिरायला जाता येत नव्हते. अनेक जण वर्क फ्रॉम होम करून कंटाळले होते. कम्प्युटर वा लॅपटॉप आणि घर एवढेच आयुष्य बंदिस्त झाले होते.

अशावेळी तिघा मित्रांनी वर्किंग फ्रॉम सायकलची  भन्नाट कल्पना अमलात आणली. ट्रीपचा आनंद तर घ्यायचाच पण त्याबरोबरच प्रवासात ऑफिसचं काम करायचं… प्रवासात जिथे कुठे ढाबा किंवा चहाची टपरी दिसेल तिथे बसायचं आणि लॅपटॉपवर काम करायचं… असं करत कल्याण ते कन्याकुमारी असा 1687 किमीचा प्रवास त्यांनी सायकलवरून केला. तिघांनी वर्क फ्रॉम होमला दिलेल्या वेगळ्या आयामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अंबरनाथचा बकसन जॉर्ज, बदलापूरचा आलविन जोसेफ आणि कल्याणचा रतिश भालेराव या तिघा मित्रांनी 14 नोव्हेंबर 2020 रोजी कल्याण येथून सायकल सफारीला सुरुवात केली. त्यातील फक्त बकसन जॉर्ज हा सायकलपटू असून त्याने याआधी मनाली  ते खदूगाल तसेच गोव्यापर्यंतच्या सायकल ट्रीप केलेल्या आहेत.

तिघांनी  26 दिवस प्रवास करून  कन्याकुमारी गाठले. पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, बंगळुरू, सालेम, मदुराई, तिरुनेलवेली असा टप्प्यांत त्यांनी प्रवास केला. दिवसाला साधारण 80 किमीचे अंतर ते पार करायचे. पहाटे 4 ते सकाळी 11 असा त्यांचा प्रवास सुरू व्हायचा.

11 वाजता ऑफिसची वेळ सुरू होताच ते ढाबा किंवा टपरीजवळ थांबून काम करायचे. प्रत्येकाकडे दोन सीम असल्याने पुरेसा इंटरनेट डेटा असायचा. मात्र बऱयाचदा नेटवर्कची समस्या निर्माण व्हायची. मात्र त्या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी नियमित ऑफिस वर्क केले.

खरं तर सायकलिंग ट्रीपचा कोणताही उद्देश नव्हता. आम्हाला फक्त रिलॅक्स व्हायचं होतं. लॉकडाऊननंतरचा हा पहिला मोठा प्रवास केला. सतत घरी काम करून शिणलेल्या जिवाला चार घटका विरंगुळा मिळावा, असं वाटत होतं. मी डिजिटल मीडियामध्ये काम करतो. माझ्या कामावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मी ऑफिसमध्ये सांगितले होते. त्याप्रमाणे काम आणि ट्रीप दोन्ही केले.  – बेकसन जॉर्ज, अंबरनाथ

ट्रीपच्या आठवणी संस्मरणीय

तिघा मित्रांचा कल्याण ते कन्याकुमारी हा प्रवास सामान्य पर्यटकांसारखा निश्चितच नव्हता. त्यामुळे त्यांना खूप ठिकाणं बघता आली नाहीत. मात्र वेगवेगळ्या ठिकाणच्या जीवनपद्धती, स्थानिकांशी होणारा संवाद, तिथली खाद्यसंस्कृती, निसर्गसौंदर्य  बघणे खूपच अविस्मरणीय ठरले. सायकलिंग नव्हे हे तर मेडिटेशन असल्याचे त्यांनी सांगितले.