चक्रीवादळे उंबरठ्यावर

883

>> श्रीनिवास औंधकर

या वर्षी उशिरा आलेल्या मान्सूनने नंतर सरासरीपेक्षा कितीतरी जास्त ‘अतिवृष्टी’ करीत जास्त काळ ठाण मांडले. महाराष्ट्राच्या सर्वच भागात अतिवृष्टीचे तडाखे बसले. त्यात ऐन दिवाळीच्या तोंडावर अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘कयार’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. पाठोपाठ बंगालच्या उपसागरात ‘महा’ चक्रीवादळ निर्माण झाले आणि त्याचाही फटका बसला. आता ‘बुलबुल’ या चक्रीवादळाने थैमान घातले आहे. हिंदुस्थानी उपखंडातील तिन्ही समुद्रांमध्ये अशी चक्रवाताची स्थिती वारंवार निर्माण होत असल्याने चक्रीवादळे हिंदुस्थानच्या उंबरठय़ावरच आहेत असेच म्हणावे लागेल.

ऐन दिवाळीत आलेल्या मुसळधार पावसाने राज्यभर धुमाकूळ घातला. दसरा संपल्यानंतर थंडी वाढण्यास सुरुवात झाली होती अन् अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस परतीचा नव्हता, तर अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण झाल्याने असा फटका बसला. दिवाळीच्या काळात हिंदुस्थानी उपखंडातील तिन्ही समुद्रांत चक्रवाताची परिस्थिती निर्माण झाली आणि चक्रीवादळाच्या संख्येतही अचानक वाढ दिसून आली.

21 ऑक्टोबर रोजी माझ्या अंदाजाप्रमाणे दक्षिण पश्चिम हिंदुस्थानात तसेच अरबी समुद्रात ( मंगलोरच्या पश्चिम समुद्रात) चक्रवात निर्माण होत आहे असे सांगितले होते. त्या चक्रवाताचे ‘क्यार’ या चक्रीवादळात रूपांतर झाले आणि संपूर्ण गोवा राज्य व उत्तर कर्नाटक किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडला. तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातदेखील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘क्यार’ चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातले.

‘क्यार’ चक्रीवादळ पुढे पश्चिम दिशेला सरकून त्याने अरबी समुद्रात तीव्र स्वरूप धारण केले आणि ओमानच्या दक्षिण दिशेने त्याचे मार्गक्रमण झाले. ओमानच्या किनारपट्टीला त्याचा फटका बसला. याच काळात दक्षिण चेन्नईच्या पूर्व समुद्रात (बंगालच्या उपसागरात) नवीन चक्रवाताची परिस्थिती निर्माण झाली. त्याच्या तीव्रतेत वाढ होत संपूर्ण तामीळनाडू आणि केरळसह श्रीलंकेला मोठय़ा प्रमाणावर पावसाचा फटका बसला. कोकण, गोवा व उत्तर कर्नाटक किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडल्यानंतर हे ‘क्यार’ चक्रीवादळ पश्चिम दिशेला सरकून अरबी समुद्रात तीव्र स्वरूप धारण करू लागले. 2007 साली अरबी समुद्रात तीव्र स्वरूप धारण केलेल्या ‘गोणू’ चक्रीवादळाची आठवण करून देणारे हे वादळ ठरले.

‘क्यार’ चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिम दिशेला समुद्रात सुमारे 650 किमी अंतरावर सरकत त्याने सुपर सायक्लॉन म्हणजे ‘तीव्र स्वरूप’ धारण केले. यावेळी त्याचा वातावरणीय दाब 980 मिली बार इतका खाली आला होता.  या चक्रीवादळाचा चक्रीय वेग ताशी 160 मैल ( म्हणजेच ताशी 257 किमी) होता. त्यामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या आजपर्यंतच्या इतिहासात तीव्र चक्रीवादळाच्या यादीत ‘क्यार’ दुसरे ठरले. क्यार चक्रीवादळाची दिशा, स्थान, वेग यामुळे दक्षिणेकडील कमी दाबाचे क्षेत्र हिंदुस्थानच्या पश्चिम किनारपट्टीवरून उत्तरेकडे  व दिनांक 2 नोव्हेंबर 2019 रोजी दक्षिण गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता होती. त्यानुसार दिनांक 1 नोव्हेंबरनंतर गुजरात, महाराष्ट्रातील उत्तर भाग, नाशिक/धुळे व राजस्थान येथे मुसळधार पाऊस पडलाच.  मात्र पुढे ‘क्यार’ चक्रीवादळाने दिशा बदलली.

त्यानंतर बंगालच्या उपसागरातील निर्माण झालेले दुसरे कमी दाबाचे क्षेत्र हिंदी महासागरातून अरबी समुद्रात दाखल झाले. त्यामुळे तामीळनाडू आणि केरळसह श्रीलंका प्रदेशावर मोठय़ा प्रमाणावर तसेच महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर काही ठिकाणी पावसाचा फटका बसला.

बंगालच्या उपसागरातील पश्चिम दिशेला व श्रीलंकेच्या पूर्व दिशेला हिंदी महासागरामध्ये आणखी एक तीव्र चक्रवात निर्माण झाला. 31 ऑक्टोबर रोजी हा चक्रवात दक्षिण अरबी समुद्रात पोहोचला व त्याचे रूपांतर ‘महा’ या चक्रीवादळात झाले. तिथून अरबी समुद्रात पश्चिम दिशेला सरकून अतितीव्र स्वरूप धारण करून मुंबईच्या पश्चिम अरबी समुद्रात दाखल झाले. पुढे हे चक्रीवादळ तीव्र होऊन गुजरातच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकून कमकुवत झाले.

ही चक्रीवादळांची मालिका ‘क्यार’ चक्रीवादळापासून सुरू झाली. ‘क्यार’ व ‘महा’ या दोन चक्रीवादळांनंतर आता ‘बुलबुल’ चक्रीवादळाने थैमान घातले आहे.

थंडीत अचानक वाढ अपेक्षित
उत्तर व मध्य हिंदुस्थानात दाखल झालेली थंडी अद्याप महाराष्ट्रात दाखल झाली नाही. थंडी घेऊन येणारे पश्चिमी विक्षोपीय वारे अर्थात ध्रुवीय वारे महाराष्ट्रात आता दाखल होत आहेत  व त्यामुळे  थंडीमध्ये अचानक वाढ अपेक्षित आहे. किमान तापमानात चार ते पाच अंशांची घट अपेक्षित आहे. ऐन दिवाळीच्या सुरुवातीला पावसाने जरी थैमान घातले असले तरी दिवाळीच्या उत्तरार्धात थंडीचे आगमन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अन् या वर्षी थंडी अधिक काळासाठी बस्तान मांडून बसणार आहे.

अनेक नवीन पक्षी पाहायला मिळणार
पृथ्वीवरील कमी कालावधीच्या हिमयुगाची चाहूल लागली आहे. गेल्या महिन्यात शेवटी अमेरिकेत झालेली बर्फवृष्टी तसेच किमान तापमानात होत असलेली घट पाहता याही वर्षी येत्या काळात थंडी आपले बस्तान ठोकणार हे निश्चित आहे. वाढत्या थंडीमुळे उत्तर गोलार्धातील. सायबेरिया, रशिया, मंगोलिया अशा देशांतून वेगवेगळे पक्षी स्थलांतर करून आपल्याकडे येतात. आमचे मित्र मानद वन्य जीवरक्षक  अतिंद्र कट्टी यांना मूळ उत्तर गोलार्धातील सायबेरिया, रशिया, मंगोलिया येथे वास्तव्य करणारा गांधेरी अर्थात तपकिरी खाटीक पक्षी नांदेड परिसरात दिनांक 18 ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी प्रथमच आढळून आला आहे.  त्यामुळे यंदाच्या थंडीमध्ये आणखी कोणते नवे पक्षी महाराष्ट्रातील पक्षीप्रेमींना पाहायला मिळणार हे आता पाहायचे.

(लेखक  एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब, संभाजीनगरचे संचालक आहेत.)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या