दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तुल सापडले ?

732

Narendra Dabholkar murder case नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांना एक मोठे यश आल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CBI ला एक पिस्तुल सापडले आहे. याच पिस्तुलाने दाभोलकर यांची हत्या करण्यात आली असावी असा सीबीआयला संशय आहे. दाभोलकर यांची 2013 साली पुण्यामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून आजपर्यंत त्यांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र सापडले नव्हते. या पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी नॉर्वेच्या पाणबुड्यांना बोलावण्यात आले होते.

हे पिस्तुल समुद्राच्या किंला खाडीच्या खोल तळाशी असल्याचा तपास यंत्रणेला संशय होता. यासाठी त्यांनी खोलवर जाऊ शकणाऱ्या पाणबुड्यांची मदत घेण्याचं ठरवलं होतं. जे पिस्तुल सापडले आहे तेच दाभोलकर यांच्या खुनासाठी वापरण्यात आले असावे असा सीबीआयला संशय आहे. याच पिस्तुलाने त्यांची हत्या झाली होती अथवा नाही हे जाणून घेण्यासाठी हे पिस्तुल न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. ऑगस्ट 2019 मध्ये सीबीआयने पुण्यातील न्यायालयाला माहिती दिली होती की हे पिस्तुल शोधण्यासाठी ठाण्याजवळच्या कळवा इथल्या खारेगांव खाडीमध्ये शोध घेण्यात येणार आहे.

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दाभोलकर यांची ओंकारेश्वर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांच्यासह 7 जण हे आरोपी असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. या पिस्तुलाचा शोध घेण्याचे काम हे अनेक दिवसांपासून सुरू होते. हे पिस्तुल न्यायवैद्यक शाळेत पाठवलं असून त्याची तपासणी करण्यात येईल. या बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीचा आकार हा दाभोलकर यांच्या पॉस्टमॉर्टेम अहवालात दिलेल्या गोळीच्या आकाराशी मिळता जुळता आहे की नाही हे तपासण्यात येणार आहे असं एका अधिकाऱ्याने हिंदुस्थान टाईम्स या इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

एन्व्हीटेक मरीन कन्सल्टंट या कंपनीला सीबीआयने हे पिस्तुल शोधण्यासाठी नेमलं होतं. या कंपनीने नॉर्वेतील तंत्रज्ञान वापरून या पिस्तुलाचा शोध सुरू केला होता. या शोधासाठी आतापर्यंत 7.5 कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा खर्च सीबीआय तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दहशतवादविरोधी पथक संयुक्तरित्या उचलण्याची शक्यता आहे. दाभोलकर यांच्याप्रमाणेच कर्नाटकात गौरी लंकेश आणि एम.एम. कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली होती. दाभोलकरांप्रमाणेच कोल्हापुरात गोविंद पानसरे यांचीही हत्या करण्यात आली होती. या तीन खुनांचा तपास महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पोलीस करत आहेत.

जवळपास वर्षभर या पिस्तुलाचा शोध घेण्याचं काम सुरू होतं. ज्या ठिकाणी हा शोध घेतला जात होता ती खाडी आहे, समुद्र नाही असं असतानाही पिस्तुल शोधायला एवढा वेळ का लागावा असा प्रश्न बचाव पक्षाच्या वकिलांनी विचारला आहे. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्यापुढे सुरु होती. धर्माधिकारी यांनी वैयक्तिक कारणांमुळे गेल्या महिन्यात राजीनामा दिला होता. जेव्हा ते या प्रकरणाची सुनावणी करीत होते, तेव्हा त्यांनी तपास यंत्रणांना धीम्या तपासाबद्दल सातत्याने फटकारलं होतं.

नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी हत्या करण्यात आली होती. 2014 साली या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणी 6 सप्टेंबर 2016 रोजी पहिलं आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये विरेंद्र तावडे हा मुख्य आरोपी असल्याचं दाखवण्यात आलं होतं. सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या असंही त्यात नमूद होतं. फेब्रुवारी 2019मध्ये सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केलं होतं. यामध्ये सचिन अंदुरे, शरद कळसकर यांनी गोळ्या झाडल्याचं म्हटलं होतं. 20 नोव्हेंबर 2019 मध्ये सीबीआयने संजीव पुनाळेकर आणि त्यांची सहकारी विक्रम भावे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं. हे दोघेही दाभोलकर यांच्या हत्येसाठी रचण्यात आलेल्या कटात सहभागी होते असं या आरोपपत्रात म्हटलं होतं. या दोघांना 25 मे रोजी अटक करण्यात आली होती आणि 5 जुलैला या दोघांना जामीन मिळाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या