
दैनंदिन वापरातील ग्राहक उत्पादने बनवणारी डाबर इंडिया ही प्रसिद्ध कंपनी आता मसाले उद्योगात पाय रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर झाल्यावर कंपनीने बादशाह मसालामधील हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. डाबरने बादशाह मसाला प्रायव्हेट लिमिटेडमधील 51 टक्के हिस्सा विकत घेण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे, असे संयुक्त निवेदनात म्हटले आहे. या करारानंतर बादशाह मसाल्यावर डाबर इंडियाचे मालकी हक्क असणार आहेत.
दोन्ही कंपन्यांच्या संयुक्त निवेदनानुसार, बादशाह मसाले, मिश्रित मसाले आणि इतर खाद्य पदार्थांचे उत्पादन, विक्री आणि निर्यात करते. डाबर इंडियाने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, हे संपादन कंपनीच्या अन्न क्षेत्रातील नवीन श्रेणींमध्ये प्रवेश करण्याच्या धोरणात्मक हेतूनुसार आहे. डाबर इंडियाने सांगितले की 51 टक्के इक्विटी हीस्सेदारीसाठी 587.52 कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. या करारासाठी बादशाह मसाल्याची किंमत 1. 152 कोटी रुपये होती. कंपनीने सांगितले की 49 टक्के हिस्सा पुढच्या पाच वर्षानंतर घेतला जाणार. तसेच मालकी हक्काबरोबरच डाबर इंडियाचा तीन वर्षात खाद्य व्यवसाय 500 कोटींनी वाढविण्याचा मानस आहे.
मागच्या दिवसात जाहीर झालेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांमध्ये, डाबर इंडियाच्या एकत्रित नफ्यात 2.85 टक्क्यांनी घट झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा नफा 490.86 कोटी इतका होता. त्याचवेळी, गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 505.31 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तथापि, ऑपरेशनमधून कंपनीचा महसूल 6 टक्क्यांनी वाढला आहे आणि तो 2,986.49 कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 2,817.58 कोटी रुपये होता.
डाबरच्या फूड्स अँड बेव्हरेजेस डिव्हिजनमध्ये 30 टक्क्यांनी मजबूत वाढ झाली आहे. फूड्स व्यवसायाने 21 टक्के वाढ नोंदवली, तर बेव्हरेजेस व्यवसायाने सप्टेंबर तिमाहीत 30 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. डाबर रेड पेस्टच्या यशस्वी कामगिरीमुळे होम केअर क्षेत्रात सुमारे 21 टक्के वाढ झाली, तर टूथपेस्ट क्षेत्रात 11 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या तिमाहीत शॅम्पू आणि पोस्ट वॉश व्यवसायात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याव्यतिरिक्त, डाबरच्या ओटीसी आयुर्वेदिक विभागाने 9 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे.

























































