नवी मुंबईत ज्वेलरवर दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

नवी मुंबईत दरोडेखोरांनी ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा घातला आहे. बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.

नवी मुंबईच्या खारघरमध्ये बीए एम ज्वेलर्सचे दुकान आहे. रात्री 10 च्या सुमारास तीन दरोडेखोर हेल्मेट आणि काळा रेनकोट घालून आले होते. त्यापैकी एका दरोडेखोराकडे बंदुक होती. त्याने हवेत गोळीबार करून आधी दहशत पसरवली. त्यानंतर ज्वेलर्समधल्या कर्मचाऱ्यांना धमकावलं आणि दागिने बॅगेत भरायला सांगितले.

दरोडेखोरांनी 11 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. तीन मिनिटांत या दरोडेखोरांनी चार ते पाच राऊंड फायर केले. यात एक व्यक्ती जखमीही झाली. त्यानंतर बाईगकवरून या दरोडेखोरांनी पोबारा केला. जातानाही दरोडेखोरांनी हवेत गोळीबार केला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.