
न्यूझीलंडमध्ये घडलेल्या एका विचित्र घटनेत 3 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलीसोबत खेळत असताना तिचे वडील तिच्या अंगावर पडल्याने तिला गंभीर स्वरुपाची इजा झाली होती. रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं.
रॉबर्ट आणि एमा हे दाम्पत्य 2011 साली इंग्लंडहून न्यूझीलंडमध्ये स्थायिक झालं होते. दोघांना अँबरली नावाची तीन वर्षाची मुलगी होती. रॉबर्ट आणि कुटुंबीय न्यूझीलंडच्या वेलिंग्टन शहरात राहत होते. गेल्या वर्षी 29 जून रोजी रॉबर्ट त्यांची मुलगी अँबरलीसोबत एका उद्यानात खेळायला गेले होते. या उद्यानात असलेल्या सुपरनोवा रिंगवर हे दोघे खेळत होते.
रिंगच्या जमिनीकडे असलेल्या बाजूला रॉबर्ट उभा होता आणि त्याच्या विरुद्ध बाजूला अँबरलीन बसली होती. रॉबर्टने रिंगवर हळूहळू चालायला सुरुवात केल्याने ही रिंग हळूहळू गोल फिरायला लागली. रिंगवर चाल चालत असताना रॉबर्टचा तोल जायला लागला ज्यामुळे त्याने रिंगवरून जमिनीवर उडी मारली. रॉबर्ट रिंगवरून उतरल्याने रिंग असमतोल झाली आणिअँबरलीन रॉबर्टच्या दिशेने घरंगळत खाली येत जमिनीवर आदळली. तोल सांभाळण्याचा प्रयत्न करणारा रॉबर्टही त्याचवेळी जमिनीवर पडला. तो जमिनीवर पडत असताना अँबरलीन त्याच्या अंगाखाली आली होती. रॉबर्ट अँबरलीनवर जोरात पडल्याने तिला गंभीर स्वरुपाची इजा झाली होती.
या रिंगवर अनेक पालक आपल्या मुलांसोबत खेळत असतात. पण असा अपघात यापूर्वी घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या दुर्घटनेत वडील रॉबर्टची चूक नसून हा एक दुर्दैवी अपघात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या अपघातानंतर गार्डनमधील ती रिंग हटवण्यात आली आहे.





























































