
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना असलेली ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी उपयुक्त आहे. या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादा भुसे यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले.
मालेगाव येथे शनिवारी आयोजित बैठकीत कृषीमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ही मोहीम केवळ औपचारिक पद्धतीने राबवू नये. दिलेल्या निकषांप्रमाणे सर्व नागरिकांची तपासणी करण्यात यावी. पथकातील कर्मचाऱयांशी समन्वय साधून त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. नागरिकांनीही घरी आलेल्या पथकांना योग्य माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मालेगाव येथील कोविड रुग्ण आणि उपलब्ध औषधसाठय़ाची त्यांनी माहिती घेतली. याप्रसंगी उपमहापौर नीलेश आहेर, घटना व्यवस्थापक तथा अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, महापालिका आयुक्त दीपक कासार, प्रांत विजयानंद शर्मा, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. शैलेश निकम, प्रमोद शुक्ला उपस्थित होते.
बिल तपासणीसाठी लेखापरीक्षकांची नेमणूक करावी
खासगी रुग्णालयांकडून कोविडबाधित रुग्णांची लूट होवू नये म्हणून रुग्णालयांची देयके तपासण्यासाठी लेखापरिक्षकांची नेमणूक करावी. रुग्णालयाच्या दर्शनी भागात विविध सेवांचे फलक असावेत. कोरोनासाठी आवश्यक औषधांचा उपलब्ध साठा आणि त्यांच्या किंमतीचा फलक सर्व मेडिकल दुकानांबाहेर लावण्यात यावा, त्याची नियमित तपासणी करावी, अशा सूचनाही कृषीमंत्र्यांनी यावेळी दिल्या.






























































