
सोलापुरात डाळिंब संशोधनाचा फार मोठा बोर्ड लागला असला, तरी संशोधकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन डाळिंबावरील रोगांमुळे बागांची काय अवस्था झाली आहे, ते बघावे. त्यानंतर त्यावर उपाययोजना केल्या तरच डाळिंब वाचेल. या उपाययोजना त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिल्या, तर बागा वाचविण्यासाठी शासनही पुढाकार घेईल, अशी ग्वाही कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.
कृषिमंत्री दादाजी भुसे शनिवारी सांगोल्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अजनाळे येथील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, भाऊसाहेब रूपनर, प्रा. पी. सी. झपके, सभापती अनिल मोटे, राणी कोळवले, विभागीय कृषी संचालक बसवराज बिराजदार, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, प्रांताधिकारी अप्पासाहेब समिंदर, तहसीलदार अभिजित पाटील, तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ यांच्यासह कृषी सहायक, पर्यवेक्षक, शेतकरी उपस्थित होते.
दादाजी भुसे म्हणाले, जिल्ह्यामध्ये अनेक डाळिंब बागांचे तेल्या रोगामुळे नुकसान झाले आहे. मका पिकासह अनेक पिकांनाही अतिपावसाचा फटका बसला आहे. अजूनही शेतात पाणी साचलेले आहे. त्यामुळे सर्व पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, यासाठी विमा कंपन्यांना सोबत घेऊन आलो आहे. जिल्ह्यातील 2 लाख 70 हजार शेतकऱ्यांनी विमा काढला असून, त्यापैकी 60 हजार शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती विमा कंपन्यांना दिली आहे. कंपन्यांकडून शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे.
आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, अजनाळे येथील डाळिंब उत्पादक शेतकरी विजय येलपले यांनी डाळिंबावरील रोगांबाबत कृषिमंत्र्यांना निवेदन द्यावे, अशी मागणी माझ्याकडे केली होती. मात्र, मी निवेदन देण्याऐवजी मंत्र्यांनाच थेट शेतकऱ्याच्या बांधावर घेऊन येतो, असा शब्द दिला होता. आज तो शब्द खरा केला आहे.
दीपक साळुंखे म्हणाले, कृषी विभागाचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. तालुक्यात शेततळी फळबाग लागवड योजना त्यांच्या काळातच राबवली. मात्र, सध्या हवामान बदलामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. डाळिंबाची परिस्थिती पाहाता सांगोला तालुक्यात मध्यवर्ती प्रयोगशाळा होण्यासाठी विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.























































