दादर चौपाटी ‘व्ह्यूइंग गॅलरी’तून पहा मुंबईचे सौंदर्य! आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सनसेट पॉइंट, सी-लिंक, निळाशार समुद्रासह लखलखत्या मुंबईची श्रीमंती आता दादर चौपाटीच्या ‘व्ह्यूइंग गॅलरी’तून पाहता येणार आहे. 10 हजार चौरस फूट जागेत पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्यूइंग डेक’चे लोकार्पण आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पावसाचे पाणी वाहून समुद्रात नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या आऊटफॉलवर केवळ दहा महिन्यांचा कालावधीत उभारण्यात आलेल्या या आकर्षक, भव्य आणि विलोभनीय भव्य ‘व्ह्यूइंग डेक’मुळे मुंबईकरांना आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना एक अभिनव पर्यटन स्थळ उपलब्ध झाले आहे. यावेळी आमदार सदा सरवणकर, पालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत, नगरसेवक मिलिंद वैद्य, नगरसेविका श्रद्धा जाधव, प्रीती पाटणकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार, उपायुक्त हर्षद काळे, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘व्ह्यूइंग डेक’ची वैशिष्ट्ये!
 उंची समुद्रापासून सुमारे दहा फूट
 क्षेत्रफळ 10 हजार चौरस फूट
 बांधकाम 26 पिलर्सवर
 ऊर्जा बचत करणाऱ्या ‘एलईडी’ दिव्यांची रोषणाई
 एका वेळी 300 व्यक्ती उभे राहण्याची व्यवस्था
 किमान 100 लोकांची बसण्याची व्यवस्था
 26 बाकांची व्यवस्था, 8 ठिकाणी आसनव्यवस्था
 विविध प्रकारची 130 झाडे