दादरच्या कोहिनूर मिलमधून भंगाराची चोरी, साडेसत्तावीस टन लोखंडी अँगल्सने भरलेला ट्रक जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर पूर्वेकडील बंद असलेल्या कोहिनूर मिलमधील भंगाराची चोरी करणाऱया तिघांना गुन्हे शाखा युनिट-4 च्या पथकाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी रात्री मिलमधील साडे सत्तावीस टन लोखंडी अँगल्स एका ट्रकमध्ये भरून नेण्याचा प्रयत्न होत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. पोलिसांनी 12 लाखांचे लोखंडी अँगल्स, 13 गॅस सिलिंडर, गॅस कटर असा मुद्देमाल जप्त केला.

दादरच्या नायगाव परिसरात पडीक असलेल्या कोहिनूर मिलमधील जीर्ण शेडच्या लोखंडी अँगल्स काही इसम कटरच्या सहाय्याने कापून ते चोरी करून नेणार असल्याची खबर युनिट-4 च्या पथकाला मिळाली. त्यानुसार उपायुक्त बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक इंद्रजित मोरे, एपीआय यशवंत बिराजदार तसेच सावंत, साळोखे, परब, गायकवाड, चौरे आदींच्या पथकाने गुरुवारी रात्री कोहिनूर मिल गेट क्रमांक 1 च्या ठिकाणी फिल्डिंग लावली. त्यावेळी लोखंडी अँगल्सने भरलेला एक ट्रक गेटच्या बाहेर येताना दिसताच पोलिसांनी तो थांबवला. ट्रकमधील मुद्देमालाची विचारपूस करता त्यात लोखंडी अँगल्स असल्याचे व ते बाहेर काढणारा व्यक्ती अन्य कामगारांसह मिलच्या आत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलीस पथकाने मिलमध्ये जाऊन पाहणी केली असता भंगार चोरणारा आरोपी अन्य कामगारांसह तेथे मिळून आला. अब्दुल वाहिद खान (55) असे मुख्य आरोपीचे नाव असून तो भंगार विक्रेता आहे. त्याच्याबरोबर ट्रकचा मालक अब्दुल कादीर खान (42) आणि चालक आलम इम्तियाज अली असे तिघांना पकडण्यात आले.

साफसफाईच्या बहाण्याने अब्दुल मिलमध्ये घुसला होता. त्यानंतर 15 कामगारांच्या सहाय्याने त्याने मिलमधील जीर्ण झालेल्या शेडचे लोखंडी अँगल्स गॅसकटरने कापले होते आणि जवळपास साडेसत्तावीस टन लोखंडी भंगार तो चोरून नेत होता. मिलशी संबंधित अधिकाऱयांच्या आशीवार्दानेच हा प्रकार होत असणार असा पोलिसांना संशय आहे.