चोरीला गेलेले मोबाईल पोलिसांनी केले परत, दादर रेल्वे पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी, मुंबई

चार वर्षांपूर्वी चोरीला गेलेला आयफोन दादर रेल्वे पोलिसांमुळे तरुणाला परत मिळाला. दादर रेल्वे पोलिसांनी गेल्या चार वर्षांत तपास करून 110 फोन हस्तगत केले आहेत त्यापैकी 45 जणांना त्यांचे चोरीला गेलेले फोन परत केले.

लोकल प्रवासात गर्दीचा फायदा घेऊन चोरटे प्रवाशांचे मोबाईल चोरतात. काही चोरटे हे नशेकरिता चोरलेले मोबाईल काही क्षुल्लक किमतीत विकतात. अशा चोरटय़ांवर आणि चोरीचे मोबाईल घेणाऱयांवर रेल्वे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दादर रेल्वे पोलिसांनी गेल्या चार वर्षांत प्रवाशांचे चोरीला गेलेले सहा लाख 18 हजार रुपये किमतीचे 110 मोबाईल तपास करून हस्तगत केले आहेत.

वरिष्ठ निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या हस्ते प्रवाशांना त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. ठाणे येथे राहणारा तरुण हा चार वर्षांपूर्वी दादर येथून प्रवास करत होता. प्रवासादरम्यान त्याचा 70 हजार रुपयांचा आयफोन चोरीला गेला होता. पोलिसांनी तपास करून दिल्लीतून एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडून आयफोन जप्त केला. 110 जणांपैकी आज 45 जणांना त्यांचे चोरीला गेलेले मोबाईल परत करण्यात आले.