
गोविंदा पथकांना अंधारात ठेवून निवडक सदस्यांनी कुटुंबासह केलेली स्पेनवारी, समितीच्या सदस्यत्वासाठी अर्ज देण्यास टाळाटाळ, सदस्य संख्येवरून वाद, सदस्य नसलेल्या पथकांना बैठकीत बोलण्याची परवानगी नाकारणे अशा कारणांमुळे गोविंदा समन्वय समितीच्या एकीचे थर कोसळले आहेत. समितीच्या बैठकीतच दहीहंडी असोसिएशनची स्थापना करण्यात आली असून यात 9 जिल्ह्यांची तब्बल 210 गोविंदा पथके नव्या संघटनेत सहभागी झाली आहेत.
दहीहंडी उत्सव साजरा करताना थर कोसळून होणाऱया अपघातात जखमी वा मृत गोविंदांच्या कुटुंबांना मदत करता यावी, गोविंदांच्या समस्या सोडवता याव्यात, राज्य सरकार, महानगरपालिका, आयोजकांबरोबर समन्वय साधता यावा या उद्देशाने दहीहंडी समन्वय समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीची 2018 मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीही करण्यात आली. त्यानंतर समितीची 12 सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली.
दहीहंडी समन्वय समितीचे सदस्य परदेशी दौरे करताना आपल्या मर्जीतले पथकांनाच झुकते माप देत होते. त्यात गेल्या वर्षी केलेल्या चौथ्या दौऱयावेळीही तेच झाल्याने समन्वय समिती सदस्य आणि गोविंदा पथकांमध्ये शाब्दिक चकमकी उडू लागल्या. त्यामुळे वाद चिघळला आणि समन्वयाचे थर कोसळले.
समन्वय समितीच्या कार्यकारिणीची मुदत फेब्रुवारी 2023 मध्ये संपली. मात्र, कार्यकारिणीत सदस्यांची संख्या नेमकी किती असावी, यावर एकमत झाले नाही. काही जणांनी संख्या तीच हवी होती तर काही जणांना सर्वसमावेशक सदस्य संख्या असावी, असे वाटत होते. मात्र, त्यावर एकमत न झाल्यामुळे निवडणूक झाली नाही आणि नवी कार्यकारिणीही नियुक्त झाली नाही.
मंडळांची संख्या वाढणार
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दहीहंडी असोसिएशनमध्ये सध्या तरी 9 जिह्यांचा समावेश आहे. यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, जळगाव, सांगली हे जिल्हे आहेत. या दहीहंडी मंडळांची संख्या 210 असून त्यात आणखी वाढ होत जाईल, असा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला आहे.
निवडक लोकांनाच स्थान देतात!
दहिहंडीचा उत्सव साजरा करताना त्या लहान-मोठय़ा प्रत्येक गोविंदा पथक आणि मंडळांना स्थान मिळाले पाहिजे. समिती काही निवडक लोकांना सर्व ठिकाणी स्थान देत होती. मात्र, नवी दहिहंडी असोसिएशन राज्यभरातील सर्वच गोविंदा पथकांना स्थान देणार आहे. धर्मादाय आयुक्तांकडे असोसिएशनच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. – अरुण पाटील, अध्यक्ष, दहीहंडी असोसिएशन
सामान्य गोविंदांना न्याय मिळेल!
समन्वय समितीतील दोन-तीन सदस्यांचा मनमानी कारभार सुरू होता. समितीच्या पाच वर्षांतील कारभाराचे अजूनही ऑडिट करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्व कारभार पारदर्शक व्हावा आणि सर्वसामान्य गोविंदाना न्याय मिळावा, यासाठी दहीहंडी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. – कमलेश भोईर, सदस्य, दहीहंडी असोसिएशन


























































