मजबुतीच्या कामांसाठी बीकेसी, दहिसर, मुलुंड जम्बो कोविड सेंटर केले रिकामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत वादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर दहिसर, बीकेसी आणि मुलुंड जम्बो कोविड सेंटर पूर्णपणे रिकामी करण्यात आली असून या ठिकाणच्या 580 रुग्णांना सुरक्षितरीत्या इतर रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. आगामी पावसाळ्यातही अशी वेळ येऊ नये यासाठी या जम्बो कोविड सेंटरची स्ट्रक्चरल तपासणी करून आवश्यक डागडुजीची कामे करून पुन्हा सुरू करण्यात येतील, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली.

मुंबईत कालपासून स्थिरावलेल्या ‘तौकते’ चक्रीवादळाने आज चांगलेच रौद्ररूप धारण केले. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयातील आपत्कालीन विभागाला भेट देऊन संपूर्ण मुंबईचा आढावा घेतला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, पी. वेलरासू, संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते. वादळी पावसात मोठय़ा प्रमाणात झाडे कोसळली असून याची स्वच्छता करून मुंबई तातडीने पूर्वपदावर आणण्याबाबत यावेळच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

असे वादळ पाहिले नाही

मुंबईत घोंगावलेल्या ‘तौकते’ वादळासारखी परिस्थिती अलीकडच्या काळात पाहिली नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. अनेक ठिकाणी 160 मिमी पाऊस पडला. मात्र वादळाचा इशारा मिळाल्यापासून पालिकेने केलेल्या नियोजनामुळे कोणतेही मोठे संकट ओढावले नसल्याचे ते म्हणाले. वादळ काळात पेंद्र आणि राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.