
दक्षिण मुंबईत सध्या कोरोना नियंत्रणात आला असला तरी उत्तर मुंबईतील दहिसर, बोरिवली आणि कांदिवली प्रभागात रुग्णवाढ कायम आहे. त्यामुळे या विभागातील कंटेनमेंट झोनमध्ये नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून इमारतीत तीन रुग्ण आढळले तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार आहे.
मुंबईत एकावेळी हॉटस्पॉट ठरलेले धारावी, वरळीसारखे अनेक विभाग आता चांगलेच नियंत्रणात आले आहेत. मात्र उत्तर मुंबईतील काही प्रभागात रुग्ण वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे सध्या झोपडपट्टीपेक्षा इमारती-सोसायटय़ांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इमारतींमध्ये नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार तीन किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळल्यास तातडीने संपूर्ण इमारत सील करण्यात येणार असल्याची माहिती झोन -7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. याआधी इमारतीत रुग्ण आढळल्यास इमारतीचा भाग किंवा मजला सील करण्यात येत होता. मात्र आता या नियम कठोर करण्यात आले आहेत. सध्या बोरिवलीत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी मुंबईत सर्वात कमी म्हणजेच 34 दिवस, कांदिवलीत 41 दिवस आणि दहिसरमध्ये 50 दिवस आहे. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी एका दिवसांत तीनने वाढून 61 वरून 64 दिवसांवर पोहोचला आहे. तर सरासरी 1.14 वरून 1.09 पर्यंत खाली आली आहे.
अशी आहे स्थिती
– आर मध्य म्हणजेच बोरिवलीत रुग्णसंख्या 4886 वर गेली असून 159 जणांचा बळी गेला आहे. या विभागात आता 3266 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1461 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
– आर दक्षिण म्हणजेच कांदिवली 4608 रुग्णसंख्या झाली असून 132 जणांचा बळी गेला आहे. या विभागात आता 3049 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 1427 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
– आर उत्तर म्हणजेच दहिसरमध्ये 2582 रुग्णसंख्या झाली असून 107 जणांचा बळी गेला आहे. या विभागात 1827 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 648 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
























































