
मुंबईतील पश्चिम उपनगरात मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, दहिसर जम्बो कोरोना सेंटरमध्ये विविध सुविधांसह तेथील आयसीयू बेडची संख्या वाढ़वावी, यासाठी शिवसेनेने पालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांबरोबर झालेल्या बैठकीत या मागण्या मान्य झाल्या असून त्यामुळे पश्चिम उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पार्श्वभूमीवर, शिवसेना विभाग क्रमांक 1 चे विभागप्रमुख, आमदार विलास पोतनीस आणि मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी व परिमंडळ 7 चे प्रभारी उपायुक्त पराग मसुरकर यांच्याबरोबर संयुक्त पाहणी दौरा तसेच बैठकीचे आयोजित करण्यात आले. पालिका प्रशासनातर्फे यावर लवकर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन सुरेश काकाणी यांनी दिले.
बैठकीला आर-उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश वायदंडे, दहिसर जम्बो कोरोना केंद्राच्या अधिष्ठाता दीपा सालियन, प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, नगरसेवक बाळपृष्ण ब्रीद, नगरसेविका शीतल म्हात्रे, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी आणि अधिकारी उपस्थित होते.

























































