
दहिसर येथील पालिकेच्या आर उत्तर विभागातील कर निर्धारक व संचालक विभागाचे कार्यालय आता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहातील सभागृहात स्थलांतरित करण्याच्या हालचाली पालिकेकडून सुरू आहेत. या प्रस्तावाला तातडीने स्थगिती द्यावी आणि हा विभाग दहिसर येथीलच एखाद्या सोयीस्कर जागेत कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी दहिसरकरांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दहिसर विभागातील नागरिक आणि मालमत्ता मालक यांसाठी कर आकारणी, मूल्यांकन आणि करसंबंधित सेवा पुरविण्याचे काम ‘कर निर्धारक व संचालक विभाग’ या विभागामार्फत केले जाते; परंतु दहिसरच्या आर उत्तर विभाग कार्यालयाला पुरेशी जागा नसल्यामुळे हे कार्यालय आता पालिकेच्या बोरिवलीच्या आर मध्य विभागातील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
स्थानिकांची गैरसोय होणार
प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहातील बहुउद्देशीय सभागृह हे लग्न, मुंज, बारसे आदी कार्यक्रमांसाठी सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे हे सभागृह बंद करून या ठिकाणी ‘कर निर्धारक व संचालक विभाग’ कार्यान्वित केल्यास स्थानिकांना या हक्काच्या सभागृहास मुकावे लागणार आहे. तसेच दहिसर येथील नागरिकांना करासंबंधीच्या प्रशासकीय कामांसाठी वारंवार बोरिवली गाठणे गैरसोयीचे ठरणार आहे. त्यामुळे हे कार्यालय दहिसर येथीलच पालिकेच्या एखाद्या सोयीस्कर जागेत कार्यान्वित करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे.